हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा कायापालट करण्यासाठी मागील दोन वर्षांपासून कोट्यवधी रुपयांच्या निधीतून सुरू असलेल्या सुशोभीकरण व विकासकामांच्या गुणवत्तेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रेल्वे स्थानकाचे जवळपास ९० टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात असले तरी, उद्घाटनापूर्वीच अनेक ठिकाणी कामाला तडे, गळती आणि उणिवा दिसून येत असल्याने रेल्वे विभागाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होत आहेत.


हिमायतनगर रेल्वे स्थानकाचा विकास अमृत भारत योजनेअंतर्गत करण्यात येत आहे. या कामामुळे स्थानकाचा चेहरामोहरा बदलला असला तरी, प्रत्यक्ष पाहणी केली असता अल्पशा पावसातच शेडच्या अनेक ठिकाणी पाणी गळत असल्याचे दिसून आले. त्यामुळे प्रवाशांना पावसाळ्यात मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे.


नवीन कामात जुन्या इमारतीला ‘नवा मुलामा’? स्थानकावरील प्रतीक्षालयाची इमारत जुनीच असताना केवळ गिलावा व रंगरंगोटी करून जुन्या कामाला नव्या विकासकामाचा मुलामा देण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. कोट्यवधींच्या निधीतून विकासकामे होत असताना जुन्या इमारतीचा केवळ रंगरंगोटीपुरता कायापालट करून प्रवाशांच्या सुविधांकडे दुर्लक्ष का, असा सवाल उपस्थित होत आहे. त्यातच नव्याने करण्यात आलेल्या प्लॅटफॉर्मवर अनेक ठिकाणी भेगा पडल्याचेही निदर्शनास आले आहे. प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील काम अद्याप रखडलेले आहे. त्यामुळे रेल्वे स्थानकाच्या विकासकामाचा दर्जा आणि नियोजन याबाबत नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.




या कामातील त्रुटींवर यापूर्वी वृत्तपत्रांमधून बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर खासदारांनी रेल्वे स्थानकाची पाहणी करून संबंधित ठेकेदाराला जाब विचारण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर या प्रकरणात ठोस कारवाई झाल्याचे दिसून आले नाही. त्यामुळे ठेकेदाराकडून मनमानी पद्धतीने थातूरमातूर काम सुरू असल्याचा आरोप आता नागरिकांकडून केला जात आहे.
रेल्वे स्थानकाचा फेरफटका मारून पाहणी केली असता, कोट्यवधी रुपयांच्या निधीच्या तुलनेत कामाची गुणवत्ता समाधानकारक नसल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उद्घाटनापूर्वीच शेडमधून पाणी गळणे, प्लॅटफॉर्मला भेगा पडणे, जुन्या इमारतीला केवळ रंगरंगोटी करणे आणि प्लॅटफॉर्म क्रमांक दोनचे काम रखडणे, या बाबी रेल्वे विभागाच्या कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. ‘उद्घाटनापूर्वीच कामाला तडे गेले असतील, तर पुढील काही वर्षांत या विकासकामाची अवस्था काय होणार?’ असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

रेल्वे विभागाने हिमायतनगर रेल्वे स्थानकाच्या संपूर्ण विकासकामाची तांत्रिक तपासणी करून कामाची गुणवत्ता, वापरलेले साहित्य आणि खर्च झालेल्या निधीची चौकशी करावी. तसेच दोषी आढळणाऱ्या ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करून निकृष्ट कामे तातडीने दुरुस्त करावीत, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून होत आहे. उद्घाटनापूर्वीच विकासकामाला अनेक ठिकाणी तडे गेले असून, प्लॅटफॉर्म वरील फरशी उखाडत असतील, तर हा विकासाचा कायापालट की निधीचा अपव्यय? हा प्रश्न आता हिमायतनगरकरांकडून उपस्थित केला जात आहे.

