नांदेड| नांदेड शहरापासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर असलेल्या मरळक बुद्रुक येथील श्री विमलेश्वर महादेव मंदिर हे मराठवाड्यातील पुरातन आणि श्रद्धास्थान म्हणून प्रसिद्ध आहे. भाविकांमध्ये हे मंदिर ‘अनंतशायी विमलेश्वर’ या नावानेही ओळखले जाते. यंदाच्या श्रावण मासानिमित्त मंदिर परिसरात उभारण्यात आलेला ३६ फूट उंच भव्य त्रिशूळ भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला आहे.


हेमाडपंती स्थापत्याची प्राचीन वास्तू – अतिप्राचीन असलेल्या या मंदिराचा १३व्या शतकात देवगिरीच्या यादव राजांचे प्रधान हेमाद्री पंडित (हेमाडपंत) यांच्या काळात जीर्णोद्धार झाल्याचे सांगितले जाते. पारंपरिक हेमाडपंती स्थापत्यशैलीतील दगडी बांधकाम, भव्य रचना आणि मंदिर परिसरातील प्राचीन वास्तूवैभव आजही भाविकांचे लक्ष वेधून घेते.
कासवांची बारव अन् दीपमाळ विशेष आकर्षण – मंदिर परिसरातील कासवांची बारव हे येथील आणखी एक वैशिष्ट्य आहे. या प्राचीन कुंडात अनेक कासव पाहायला मिळतात. कुंडातील पवित्र पाण्याचा उपयोग महादेवाच्या अभिषेकासाठी केला जातो. मंदिर परिसरातील सुंदर दीपमाळ या ऐतिहासिक वास्तूच्या सौंदर्यात आणखी भर घालते.

३६ फुटी त्रिशूळ ठरले श्रावणातील खास आकर्षण – श्रावण मासाचे औचित्य साधून मंदिर परिसरात उभारण्यात आलेला ३६ फूट उंच भव्य त्रिशूळ भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरला आहे. त्रिशूळाच्या दर्शनासह अनंतशायी विमलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी श्रावणात भाविकांची मोठी गर्दी होत आहे.
श्रावणातील सोमवार आणि विविध धार्मिक उपक्रमांमुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. निसर्गरम्य परिसरात वसलेले हे प्राचीन शिवस्थान इतिहास, स्थापत्यकला आणि अध्यात्माचा सुंदर संगम घडवून आणते. श्रावण मासात मरळक बुद्रुक येथील विमलेश्वर मंदिराला भेट देणाऱ्या भाविकांसाठी यंदा ३६ फुटी भव्य त्रिशूळ हे खास आकर्षण ठरले आहे. छायाचित्र : विजय होकर्णे



