हिमायतनगर, अनिल मादसवार| पावसाने पाठ फिरविल्याने हिमायतनगर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. तूर, कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, हळद आणि उभा ऊस डोळ्यादेखत वाळून जात असताना शासन आणि प्रशासन मात्र कार्यालयात बसून तमाशा पाहत असल्याचा संताप शेतकऱ्यांनी व्यक्त केला. शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकारला जाग कधी येणार? असा थेट सवाल माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी उपस्थित केला.


हिमायतनगर तहसील कार्यालयावर पक्षीय राजकारण बाजूला ठेवून हजारो शेतकरी एकत्र आले. कोरड्या दुष्काळाची परिस्थिती जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना वानखेडे यांनी शासनाला स्पष्ट इशारा दिला की, तातडीने सरसकट कर्जमाफी, पीकविमा लागू करून पिकांच्या नुकसानीची भरपाई म्हणून कमीत कमी एकरी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करा; अन्यथा आगामी काळात शेतकऱ्यांच्या प्रचंड जनसागरासह तहसील कार्यालयावर भव्य (रूमने) रुद्र मोर्चा काढण्यात येईल वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ आणि एकही पुढाऱ्यांचे कार्यालय शिल्लक ठेवणार नाही असा इशारा त्यांनी दिला.


“शेतकरी जगला तरच देश जगेल, हे सरकारने विसरू नये,” असे सांगत वानखेडे यांनी अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही सुनावले. वातानुकूलित कार्यालयात बसून कागदावर परिस्थितीचा अंदाज घेण्यापेक्षा अधिकारी प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन वाळलेली पिके पाहावीत. शेतकऱ्यांची विदारक अवस्था पाहून तातडीने सरसकट मदत देण्याची कार्यवाही करावी, आणि सत्ताधारी यांनी झोपेतून जागे होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवावा अशी मागणी त्यांनी केली.



महावितरणच्या लपंडावाने शेतकरी हैराण
एकीकडे पाऊस नाही, पिके वाळत आहेत, तर दुसरीकडे महावितरणच्या वीजपुरवठ्याच्या लपंडावाने शेतकरी अधिकच संकटात सापडला आहे. शेतीपंपाला वेळेवर वीज मिळत नसल्याने उपलब्ध पाण्यानेही पिके वाचविणे कठीण झाले आहे. महावितरणचा मनमानी कारभार तातडीने बंद करून शेतकऱ्यांना नियमित आणि पुरेसा वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली.

“मोठ्यांची कर्जे माफ, शेतकऱ्यांसाठी मात्र जाचक अटी!” – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर – माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी शासनाच्या धोरणावर कडाडून टीका केली. मोठमोठ्या उद्योगपतींच्या कर्जाबाबत शासनाकडे वेगळी भूमिका असते; मात्र शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या वेळी जाचक अटींचे जाळे टाकून त्यांना वाऱ्यावर सोडले जाते, असा आरोप त्यांनी केला. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळणेही दुरापास्त झाले असून महावितरणसह विविध शासकीय कार्यालयांतील कारभारामुळे शेतकरी त्रस्त आहे. राजकारण बाजूला ठेवून शेतकरी हितासाठी आम्ही आलो आहोत. शासनाने तातडीने सर्व निकष बाजूला ठेवून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरसकट मदत करावी आणि हेक्टरी एक लाख रुपयांपर्यंत मदत देऊन बळीराजाला उभे करावे, अशी मागणी माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केली.

“अधिकाऱ्यांवर वचक नाही; मग निवडून दिले त्याचा फायदा काय?”
निवेदनापूर्वी शेतकऱ्यांनी तहसील, पंचायत समिती, महावितरण, भूमिअभिलेख, रजिस्ट्री कार्यालयांसह विविध विभागांच्या कारभारावर संताप व्यक्त केला. साध्या कामासाठीही शेतकरी आणि सर्वसामान्यांना वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कोणाचाच वचक नसल्याने सर्वत्र मनमानी सुरू आहे, असा आरोप करण्यात आला. “जनतेची कामे होत नसतील, अधिकारी ऐकत नसतील आणि कारभार पारदर्शक नसेल तर तुम्हाला निवडून देऊन आम्हाला काय फायदा झाला?” असा रोखठोक सवालही उपस्थित शेतकऱ्यांनी सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या कारभारावर केला आहे. वरून राजाची अवकृपा शेतकऱ्यांच्या मुळावर उठली आणि शासनकर्ते राजकारण करण्यात व्यस्त आहेत असा आरोपही यावेळी करण्यात आला.
यावेळी माजी खासदार सुभाषराव वानखेडे, माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर, हिमायतनगरचे नगराध्यक्ष शेख रफिक भाई, वामनराव पाटील वडगावकर, कल्याण पाटील पळसपूरकर, दत्ता पाटील सोनारीकर, प्रल्हाद पाटील टेंभुर्णीकर यांच्यासह विविध पक्षांचे पदाधिकारी आणि हिमायतनगर तालुक्यातील हजारो शेतकरी उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदार सौ पल्लवी टेमकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कृषिमंत्री आणि जिल्हाधिकारी, नांदेड यांच्याकडे पाठविण्यात आले. आता आश्वासनांची नव्हे, तर तातडीच्या मदतीची गरज आहे; अन्यथा बळीराजाचा संताप रस्त्यावर उतरेल! असे चित्र हिमायतनगर तहसील कार्यालयावर जमलेल्या नागरिक शेतकरी यांच्या संतापवरून दिसून आले आहे.

