हिमायतनगर, अनिल मादसवार| भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर वाढते अपघात, रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था, अतिक्रमण, अनधिकृत दिशादर्शक व जाहिरात फलक तसेच वाहनचालकांसाठी आवश्यक सुविधांचा अभाव यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर प्रश्नांकडे लक्ष वेधत भारतीय जनता पार्टी विद्यार्थी आघाडीचे जिल्हाध्यक्ष आदित्य पाटील शिरफुले यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे विविध मागण्या केल्या होत्या.



या मागणीची दखल घेत राष्ट्रीय महामार्ग विभाग, नांदेड यांनी दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी पत्राद्वारे सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सध्या भोकर–हिमायतनगर राष्ट्रीय महामार्गावर PBMC अंतर्गत देखभाल-दुरुस्तीची कामे सुरू असून, त्यामध्ये रस्त्याची दुरुस्ती, रस्ता सुरक्षा तसेच ब्लॅक स्पॉट सुधारण्याची कामे करण्यात येत असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.



तसेच महामार्गावरील अतिक्रमण हटवून रस्त्याची सुरक्षितता वाढविण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून धोकादायक ठरलेल्या या महामार्गावरील अपघातप्रवण ठिकाणांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.



विशेष म्हणजे, महामार्गावरील टोल वसुलीचा अधिकार NHAI कडे सोपविण्यात आला असून, टोलसंदर्भातील बाबींवर NHAI सोबत पत्रव्यवहार करण्याचा सल्ला राष्ट्रीय महामार्ग विभागाने दिला आहे.
दरम्यान, महामार्गाची दुरवस्था आणि अपघातांचा प्रश्न गांभीर्याने घेतल्याबद्दल आदित्य पाटील शिरफुले यांनी समाधान व्यक्त केले असून, रस्त्याची दुरुस्ती, अतिक्रमण हटविणे, ब्लॅक स्पॉटवरील सुरक्षा उपाय आणि टोलमधून अपेक्षित सुविधा प्रत्यक्षात उपलब्ध होतात की नाही, यावर लक्ष ठेवणार असल्याचे सांगितले.
राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या या आश्वासनामुळे भोकर–हिमायतनगर मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र, दिलेल्या आश्वासनांची ३० दिवसांत प्रत्यक्ष अंमलबजावणी होते का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

