नांदेड, अनिल मादसवार| किनवट तालुक्यातील सारखणी घाटातून जाणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्यानंतर काही वेळातच त्याचा मृतदेह रहस्यमयरीत्या गायब झाल्याने संताप उसळला आहे.


वन्यप्राण्यांच्या संवर्धनाची जबाबदारी असताना कर्तव्यच्युती केल्याचा ठपका ठेवत तत्कालीन सहाय्यक वनसंरक्षक जी. डी. गिरी आणि मांडवी वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हा दाखल करून शासकीय सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी ‘अन्याय प्रतिकार दल’ आणि पर्यावरणप्रेमी संघटनांनी केली आहे.

या संदर्भात संस्थापक कार्याध्यक्ष तथा महाराष्ट्र पर्यावरण बचाव समितीचे अध्यक्ष सिद्धार्थ तलवारे यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांना निवेदन दिले. प्रकरणात योग्य ती कारवाई न झाल्यास १३ डिसेंबरपासून विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनादरम्यान नागपूर येथे बेमुदत आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा तलवारे यांनी दिला. या वेळी सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मणराव भवरे उपस्थित होते.


सारखणी घाटातील तपासणी नाक्यापासून काही अंतरावर बिबट्याचा मृत्यू झाला होता. घटनेची माहिती स्थानिकांनी तात्काळ अधिकाऱ्यांना दिली; मात्र संबंधित अधिकारी तब्बल तीन तास उशिरा घटनास्थळी पोहोचले आणि तोपर्यंत मृतदेह गायब झाला होता. मृतदेह शोध मोहीम न राबविता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप वनप्रेमी नागरिकांनी केला आहे. नांदेड उपवनसंरक्षक केशव वाबळे यांच्या अधिपत्यातील अधिकाऱ्यांवर नियंत्रण नसल्याची टीकाही करण्यात आली.

अन्याय प्रतिकार दलाने शासन आणि वनविभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्वरित हस्तक्षेप करून बिबट्या मृत्यू आणि मृतदेह गायब प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ दखल – या गंभीर प्रकाराची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली आहे. त्यांच्या आदेशानुसार राज्याचे वनविभागाचे सचिव मिलिंद म्हैसकर आणि नागपूरचे जिल्हाधिकारी यांना योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शिंदे यांच्या हस्तक्षेपामुळे कार्यवाहीला वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

