हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येत असलेल्या वनराई कच्चे बंधारे बांधणी मोहिमेला हिमायतनगर तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. 7 ते 21 डिसेंबर या कालावधीत सुरू असलेल्या मोहिमेत कारला शिवारातील सत्संगातील भक्तांनी श्रमदानातून एकूण सात वनराई बंधारे उभारत भरीव योगदान दिले.
या बंधाऱ्यांमध्ये साठणारे पाणी येत्या हंगामात शेतकऱ्यांच्या शेतीसाठी वरदान ठरणार असून, पाणीसाठ्यामुळे पिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. कारला, कामारीसह तालुक्यातील तीन गावांमध्ये प्रत्येकी पाच बंधारे उभारण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी कारला–कामारी परिसरात सात बंधाऱ्यांचे काम पूर्ण झाले आहे.
मुख्य नाल्यावर उभारलेल्या या बंधाऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांना पाण्याचा स्थिर आणि वेळेवर उपलब्ध होणारा स्रोत मिळणार आहे. “तुम्ही जगा, दुसऱ्याला जगवा” हा जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा संदेश या उपक्रमातून प्रत्यक्षात उतरत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे.
या श्रमदान उपक्रमात सत्संग मंडळाचे अध्यक्ष शिवाजी एटलेवाड, तसेच आनंद रासमवाड, दत्ता शिरफुले, इश्वर एटलेवाड, गणपत यमजलवाड, पांडुरंग यमजलवाड, मुकींद गोणेवाड, आणि महिला भक्तांमध्ये आशाताई बोयले, अर्चनाबाई चिंतलवाड, सुमनबाई इटेवाड, लक्ष्मीबाई रासमवाड, ज्योती रासमवाड यांनी सक्रिय सहभाग घेतला. भक्तांच्या या सामूहिक श्रमदानाचे गावकऱ्यांकडून मोठे कौतुक करण्यात येत असून, बंधाऱ्यांचा लाभ आगामी पिकांच्या हंगामात स्पष्टपणे जाणवणार आहे.

