हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणूकित काँग्रेस पक्षाने घवघवीत यश मिळवत नगरपंचायतीवर दुसऱ्यांदा आपला झेंडा फडकावला आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब यांच्यासह काँग्रेसचे ८ नगरसेवक विजयी झाले आहेत. या विजयामागे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांचे नेतृत्व व प्रयत्न निर्णायक ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.


रविवार, दिनांक २१ सकाळी शांततेत पार पडलेल्या मतमोजणीत काँग्रेसचा वरचष्मा स्पष्टपणे दिसून आला. अंतिम निकालानुसार काँग्रेसचे ८ नगरसेवक, भाजपाचे ३ नगरसेवक, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) ३ नगरसेवक, शिवसेना (शिंदे गट) २ नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) १ नगरसेवक असे निवडून आले.


थेट नगराध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शेख रफिक शेख महेबुब यांना ६,६५० मते मिळाली, प्रतिस्पर्धी भाजपचे उमेदवार डॉ. राजेंद्र वानखेडे यांना ४,२८१ मते मिळाली. शेख रफिक शेख महेबूब यांचा २,५६९ मतांनी दणक्यात विजय झाला.



वॉर्ड निहाय विजयी नगरसेवक पुढीलप्रमाणे असून, १) चायल दर्शना शरद – भाजपा, २) गुंडेवार विनोद गणपत – काँग्रेस, ३) कंजुल फिरदोस अ. हक्क – काँग्रेस, ४) मेंडके कमल संभाजी – काँग्रेस, ५) हसीना बेगम अ. सलाम – काँग्रेस, ६) मुद्देवाड अरुण भगवान, ७) पंडित दर्शना रमेश – काँग्रेस, ०८) मिर्झा जिशान बेग – शिवसेना (उबाठा), ०९) राठोड सुचिता कुणाल – शिवसेना (उबाठा), १०) सकवान आशिष बाबुराव – भाजपा, ११) डाके भारत माधवराव – भाजपा, १२ ) ठाकरे विठ्ठल भिमराव – शिवसेना (उबाठा), १३) सरदार खान खलील खान – राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), १४) म. मुजतबा मतीन – काँग्रेस, १५) शे. सलमाबी शे. इलियास – काँग्रेस, १६) सलमाखानम समद खान – काँग्रेस, १७) बलपेलवाड सुभाष पोतन्ना – शिवसेना यांचा समावेश आहे.

हिमायतनगरच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देण्याचा निर्धार नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांनी व्यक्त केला. विजयानंतर नवनिर्वाचित नगराध्यक्ष शेख रफिक सेठ व सर्व नगरसेवकांना निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार सौ.पल्लवी टेमकर यांनी प्रमाणपत्र देऊन मजबूत लोकशाहिसाठी शुभेच्छा दिल्या. निवडणूक निकालानंतर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून यठिकठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येऊन रात्री उशिरापर्यंत शहरातील गस्तीवर होते.
