नांदेड| तख्त सचखंड श्री हजूर अबिचलनगर साहिब, नांदेड येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही बंदीछोड दिवस (दीपावली) उत्सव मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दीपमाला महल्ल्याला तोफांची सलामी देण्यात आली.


गुरुद्वारा सचखंड बोर्डाचे प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ (IAS Retd.) यांनी सांगितले की, जगभरातील हजारो भाविकांनी तख्त साहिब येथे दीपप्रज्वलन करून गुरु हरगोबिंद साहिब जींच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. या दिवशी गुरु हरगोबिंद साहिब जींनी ५२ हिंदू राजांसह ग्वाल्हेर किल्ल्यातून मुक्तता मिळवून श्री अमृतसर साहिब गाठले होते. त्या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ दरवर्षी बंदीछोड दिवस साजरा केला जातो.



दीपमाला महल्ला दुपारी ४ वाजता भाई ज्योतिंदर सिंघ जी यांच्या अरदासनंतर निघाला. यात निशानची सिंघ, सोन्या-चांदीच्या खोगीर लावलेले घोडे, कीर्तनी मंडळ, गतका, बँड पथक आणि देश-विदेशातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. “खालसा हल्ला बोल चौक” येथे पारंपरिक “हल्ला” सादर करण्यात आला, ज्यातून गुरुजींच्या काळातील युद्धशौर्याची झलक दिसली.



महल्ला बाफना चौक, शहीद भगतसिंघ रोड, अबिचलनगर, जुना मोंढा मार्गे गुरुद्वारा नगिनाघाट साहिब येथे पोहोचून रात्री १०:३० च्या सुमारास तख्त साहिब येथे संपन्न झाला. शेवटी प्रशासक डॉ. विजय सतबीर सिंघ जी आणि स. जसवंत सिंघ बोंबी यांनी देश-विदेशातील भाविक, संत महापुरुष आणि हजुरी साधसंगत यांचे आभार मानले. ही माहिती गुरुद्वारा तख्त सचखंड बोर्ड, नांदेड यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.




