मुखेड/ नांदेड| मुखेड तालुक्यात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने भिंगोली, भेंडेगाव, हसनाळ, रावणगाव, भासवाडी, सांगवी भादेव आदी गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.


पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे शेतजमिनी तुडुंब भरून वाहिल्या. कापूस, सोयाबीन, तुरीसह इतर हंगामी पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे तब्बल १०० टक्के नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहेत. शेतातील पिकांसह साठवलेले धान्य, घरगुती साहित्य व जनावरांचे खाद्य देखील वाहून गेले आहे. तर मुक्रमाबाद व लेंडी परिसरातील गुरे,ढोरे, जनावरे मृत्युमुखी पडले आहेत पूर ओसरल्यानंतर हि स्थिती दिसली असून, मुसळधार पावसात रात्री काय परिस्थिती असेल हे विचार करून मन सुन्न होण्याची वेळ पूरग्रस्त भागातील नागरिक शेतकऱ्यावर आली आहे.


काही गावांतील घरे पाण्याखाली गेल्याने नागरिकांना रात्रभर घराबाहेर काढून सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला. शाळा, मंदिरे व उंच जागा नागरिकांसाठी तात्पुरती निवारा केंद्रे ठरली. स्थानिक नागरिकांनी “झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी तातडीने मदत जाहीर करावी, शेतकरी उद्ध्वस्त झाले आहेत” अशी मागणी केली आहे.



प्रशासनाची धावपळ – आमदारांचा आढावा, एनडीआरएफची टीम दाखल
पूरस्थितीवर आमदार डॉ. तुषार राठोड यांनी प्रत्यक्ष पाहणी करून प्रशासनाला मदतकार्य गतीमान करण्याच्या सूचना दिल्या आहेत. उपविभागीय अधिकारी अनुप पाटील व तहसीलदार राजेश जाधव यांनीही पूरग्रस्त भागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. नागरिकांचे जीवित व मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी एनडीआरएफची टीम मुखेड तालुक्यात दाखल झाली असून बचावकार्य सुरू आहे.

