हदगाव, शेख चांदपाशा| हदगाव तहसील कार्यालय परिसर सध्या नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहे. पावसाळ्यामुळे इथे मोठ्या प्रमाणात झाडे-झुडपे, चिखल, घाण पाणी व डबकी साचल्याने ग्रामीण भागातून तहसीलच्या कामासाठी येणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.


सर्वात धोकादायक बाब म्हणजे या परिसरात साप, विंचू, डुकरं आणि मोकाट जनावरे फिरताना दिसतात. तहसील कार्यालयाच्या प्रांगणात बसण्यासाठी कोणतीही सोय नसल्याने नागरिकांना अक्षरशः उभे राहूनच आपले काम भागवावे लागते.

या इमारतीत बालविकास प्रकल्प, पंचायत समिती, गटशिक्षणाधिकारी कार्यालय, पाटबंधारे विभाग यांसारखी अनेक महत्त्वाची शासकीय कार्यालये असल्याने ग्रामीण जनतेची सततची वर्दळ असते. तरीदेखील परिसरातील स्वच्छता आणि देखभालीकडे प्रशासनाचे कमालीचे दुर्लक्ष आहे.


वायफळ खर्चावर प्रश्नचिन्ह
तहसील इमारतीच्या आतील दुरुस्तीवर लाखो रुपयांचा खर्च केला जात असताना, प्रत्यक्षात काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले आहे. पहिल्या मजल्यावरील पंचायत समिती कार्यालय तसेच दुसऱ्या मजल्यावरील नवीन शेडच्या दुरुस्तीचीही अवस्था बिकट आहे. पत्रकार व नागरिकांनी अनेकदा या समस्यांकडे लक्ष वेधले असले तरी तहसील प्रशासन मात्र “आम्ही काही सांगू शकत नाही” अशा टाळाटाळीच्या भूमिकेत असल्याचे दिसून येते. तहसीलदार मॅडम या गंभीर प्रश्नाकडे लक्ष देणार की..? पुन्हा नागरिकांच्या हालाकीवर दुर्लक्षच करणार?


