नांदेड। दैनिक गोदातीचे उपसंपादक , पत्रकार मनोहर कदम यांना यावर्षीचा लोकसंवाद राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे . भोकर येथे पार पडणाऱ्या लोकसंवाद साहित्य संमेलनात दिनांक 3 जानेवारी 2025 रोजी मान्यवरांच्या हस्ते पत्रकार मनोहर कदम यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे.
श्री यशवंतराव ग्रामविकास व शिक्षण प्रसारक मंडळ करकाळा, ता.उमरी, जि. नांदेडच्या वतीने दरवर्षी समाजातील विविध क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल राज्यस्तरीय लोकसंवाद पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात येतो. 20 व्या लोकसंवाद ग्रामीण संमेलनात खा. रवींद्र चव्हाण, आ. हेमंत पाटील, आ. रामराव पाटील, आ. राजेश पवार, शिरीषभाऊ गोरठेकर, संमेलनाध्यक्ष प्रा. महेश मोरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
गेल्या अनेक वर्षापासून नांदेड जिल्ह्यातील पत्रकारियेत अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काम करून शोषित, पीडित , वंचित , शेतकरी , कामगार कष्टकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी आपली लेखणी झीजविणारे दैनिक गोदातीची उपसंपादक , अभ्यासू आणि संयमी पत्रकार मनोहर कदम यांची यावर्षीच्या लोकसंवाद राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड लोकसंवाद साहित्य संमेलनाच्या पुरस्कार निवड समितीने केली आहे.
देवीदास फुलारी, राम तरटे, प्रा. धाराशिव शिराळे, निर्मलकुमार सूर्यवंशी, अॅड. एल.जी. पुयड, सोपानराव लामकानीकर, नागोराव डोंगरे यांच्या निवड समितीने ही निवडप्रक्रिया पूर्ण केली, अशी माहिती संयोजक दिगंबर कदम यांनी दिली आहे. पुरस्काराचे स्वरूप प्रशस्तिपत्र, महावस्त्र, सन्मानचिन्ह, गौरवपदक व रोख रक्कम, ग्रंथ भेट व पुष्पहार असे आहे. पत्रकार मनोहर कदम यांना जाहीर झालेल्या राज्यस्तरीय लोकसभा उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्काराबद्दल विविध क्षेत्रातील मान्यवरांनी मनोहर कदम यांचे अभिनंदन केले आहे.