नांदेड| सिनेमा ही कला आहे आणि तंत्र देखील आहे. सिनेमा तयार करण्यासाठी जीवनाकडे डोळे उघडे ठेवून पहा. ध्येयनिश्चिती शिवाय आपली अभिव्यक्ती दमदार होऊ शकत नाही. तुम्ही असा सिनेमा निर्माण करा त्यात आपल्या ध्येयाचे प्रतिबिंब असेल. असे प्रतिपादन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी केले.
राष्ट्रीय फिल्म आणि टेलिव्हिजन संस्था,पुणे (एफटीआयआय) आणि स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बेसिक कोर्स इन स्मार्टफोन फिल्म मेकिंग’ या कोर्सचे कुलगुरूंच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी एफटीआयआय चे कोर्स संचालक रितेश ताकसांडे, माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, आंतरविद्याशाखीय विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. चंद्रकांत बाविस्कर, ललित व प्रयोगजीवी कला संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, डॉ. दीपक शिंदे, डॉ. रमेश ढगे आदी उपस्थित होते.
कोर्स संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर यांनी संकुलाची माहिती दिली. तसेच येणाऱ्या काळात फिल्म प्रॉडक्शन हा कोर्स देखील विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिला जाईल, असे सांगीतले. सहा दिवस चालणाऱ्या स्मार्ट फोन फिल्म मेकिंग या कोर्स मध्ये संहिता लेखन, चित्रीकरण, संकलन आधी बाबी शिकविल्या जाणार आहेत.
या कोर्ससाठी बिकानेर, नांदेड, परभणी, लातूर, मुंबई, ग्वालिअर आदि ठिकाणाहून विदयार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन डॉ. सचिन नरंगले यांनी केले. तर डॉ. सुहास पाठक यांनी उपस्थितांचे आभार मानले. फोटो कॅप्शन: ‘स्वारातीम’ विद्यापीठ व एफ.टी.आय.आय. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्मार्टफोन फिल्म मेकिंग कोर्सच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, डावीकडून माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. राजेंद्र गोणारकर, कोर्स संचालक श्री. रितेश ताकसांडे, डॉ. पृथ्वीराज तौर.