नांदेड l २० नोव्हेंबर रोजी माहूर तालुक्यातील दोन दलित महिलांची दागिने लुटून,गळा आवळून हत्या केल्याचे प्रकरण राज्यभर गाजत असून नांदेड व यवतमाळ जिल्हा पूर्णतः हादरला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांनी जलद गतीने तपासाची चक्रे फिरवून काही तासातच दोन्ही आरोपीना अटक केली असल्यामुळे दोन्हीही मयताच्या मुलांनी पोलीस अधीक्षक आणि पोलीस खात्याचे आभार मानले आहेत.


मारेकऱ्यांवर खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत ह्या दोघी सख्या जावा असून दलित प्रवर्गातील असल्यामुळे व मारेकरी जवळच्या गावातील असल्यामुळे व त्यांची नेहमीच पाचोंदा येथे येजा असल्यामुळे तो मयत महिलांना पूर्वीपासून ओळखत होता. आरोपीना मयताची जात माहिती होती म्हणून गुन्ह्यात वाढ करून ऍट्रॉसिटी व मकोका कलमे वाढवावीत व खटला जलदगती न्यायालयात चालवून मारेकऱ्यांना फासीची शिक्षा देण्यात यावी अशी लेखी मागणी मयत मातांच्या दोन्ही मुलांनी पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.


मयत महिलांचे मुले नामे नागेंद्र साहेबराव अडागळे व प्रमोद अशोक अडागळे हे २७ नोव्हेंबर रोजी जिल्हा पोलीस अधीक्षक अबीनाश कुमार यांना प्रत्यक्षात भेटून निवेदन देण्यासाठी गावाकडून नांदेड येथे आले होते.परंतु त्याच दिवशी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचा नांदेड जिल्हा दौरा असल्यामुळे बंदोबस्त कामी स्वतः पोलीस अधीक्षक असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही.

पीडित मुलांसोबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.शंकर सिडाम, राष्ट्रवादी काँग्रेस ( श.प.) पक्षाचे विधानसभा सरचिटणीस मनोज किर्तने, कॉ.प्रसराम पारडे, किरण आडागळे आदिजन माहूर येथून आले होते.
मुळचे माहूरचे रहिवासी माकप जिल्हा सचिव मंडळ सदस्य तथा नांदेड तालुका सचिव कॉ.गंगाधर गायकवाड यांनी फोनद्वारे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदनातील मागण्या संदर्भात माहिती दिली असून माहूर उपविभागीय पोलीस अधिकारी व पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे माहूर यांना सूचना देऊन गुन्ह्यात वाढ करण्यात यावी अशी विनंती केली. तेव्हा पोलीस अधीक्षक म्हणाले की,माझ्या वाचक यांना भेटून निवेदन द्यावे मी अर्ज बघून योग्य कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित पोलीस अधिकारी यांना देतो.
त्यानंतर रीतसर निवेदन वाचक शाखेत देण्यात आले. यावेळी माकप जिल्हा कमिटी सदस्या कॉ.उज्वला पडलवार, तालुका कमिटी सभासद कॉ.जयराज गायकवाड, कॉ.श्याम सरोदे, मजदूर युनियन सभासद कॉ. मंगेश वटेवाड, कॉ.बालाजी पाटील भोसले, कॉ.सोनाजी कांबळे आदींची उपस्थिती होती.
एकंदरीतच पोलीस अधीक्षक यांच्या आश्वासक बोलण्यातून लवकरच गुन्ह्यात वाढ होऊन ऍट्रॉसिटी व मकोका कलमे समाविष्ट होतील व प्रकरण जलदगती न्यायालयात सुरू होईल अशी अपेक्षा आहे. अनेक खून, अत्याचार, जबरी लूट, करणाऱ्या या सराईत गुन्हेगारानी अनेक कुटुंबे उध्वस्त केली आहेत.
पाचोंदा येथील पीडित दलित कुटुंबियांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले असून पीडितांना दिलासा मिळावा व त्यांना शासकीय मदत मिळावी यासाठी कॉ.शंकर सिडाम,मनोज किर्तने आणि कॉ.गंगाधर गायकवाड हे प्रयत्नशील असून पुढील पाठपुरावा करणार आहेत.


