नांदेड| स्वच्छ भारत अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या स्वच्छतेच्या विविध कार्यक्रमांपैकी वैयक्तिक स्वच्छतेसाठी हात धुणे हा एक महत्त्वाचा भाग आहे. जनतेच्या स्वच्छतेविषयी जागरूकता वाढवून निरोगी आणि आनंदी जीवनासाठी जागतिक स्तरावर दरवर्षी 15 ऑक्टोबर हा दिवस ‘जागतिक हात धुवा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. या अनुषंगाने, जिल्ह्यात विविध ठिकाणी हा दिवस साजरा करण्यात आला.
अर्धापूर तालुक्यातील मालेगाव येथील जिल्हा परिषद हायस्कूलमध्ये आज जागतिक हात धुवा दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात पाणी व स्वच्छता मिशनचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलतांना ते म्हणाले, प्रत्येकांनी स्वच्छतेच्या सवयी अ्रंगीकाराव्यात असे प्रतिपादन नांदेड जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नारायण मिसाळ यांनी केले. यावेळी सरपंच मारोतराव बुटले, उपसरपंच मनोहरराव खंदारे, माहिती, शिक्षण व संवाद तज्ञ मिलिंद व्यवहारे, मुख्याद्याप विनायक जमदाडे, ग्रामविकास अधिकारी एस.बी. पत्रे आदींची उपस्थिती होती.
पुढे ते म्हणाले, नियमित हात धुणे, विशेषतः जेवणापूर्वी, अन्न शिजवताना आणि स्वच्छता राखताना साबणाने हात धुणे अत्यंत महत्वाचे आहे. वैयक्तिक तसेच सार्वजनिक स्वच्छतेसाठी सर्वांनी पुढाकार घेऊन आपल्या गावाला कचरामुक्त आणि प्लास्टिकमुक्त करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी सहशिक्षिका अनुजा देशपांडे यांनी विद्यार्थ्यांना हात धुण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. या कार्यक्रमाला श्रीकांत शिंदे, मिनाक्षी मुपडे, विद्या वट्टमवाड, करुणा पवार, गणेश शिराळे, रोकडे, गजानन कल्याणकर, भागवत सुनेवाड यांच्या सह गावकरी व शालेय विद्यार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार सहशिक्षक रावसाहेब पुप्पलवाड यांनी मानले.
जिल्हयात सर्वत्र कार्यक्रम
जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये हात धुण्याच्या प्रात्यक्षिकासह स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. हात धुवा दिनाच्या संकल्पनेनुसार, अन्न स्वच्छता आणि योग्य वेळेस साबणाने हात धुणे आवश्यक आहे, जसे की स्वयंपाक करण्यापूर्वी, स्वयंपाक झाल्यानंतर, शौचालय वापरल्यावर, जेवणापूर्वी, आणि बाळाला खाऊ घालण्यापूर्वी. अनेक शाळांमध्ये, विद्यार्थ्यांसह नागरिकांनी नियमित साबणाने हात धुण्याचा संकल्प केला आहे, ज्यामुळे त्यांच्या आरोग्याची आणि स्वच्छतेची जाणीव वाढली आहे.