लोहा| स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगून एका नागरिकाची सोन्याची अंगठी हिसकावण्याचा प्रयत्न करणाऱ्या तोतया भामट्याचा डाव नागरिकाच्या प्रसंगावधानामुळे फसला. नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतल्याचे पाहताच आरोपीने स्वतःची दुचाकी आणि बनावट दागिन्यांचे गाठोडे जागीच टाकून रस्त्यालगतच्या उसाच्या फडातून पळ काढला. या प्रकरणी लोहा पोलिसांनी मुद्देमाल जप्त करून आरोपीचा शोध सुरू केला आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पारडी (ता. लोहा) येथील अंगद पाटील डिकळे हे गुरुवारी (दि. १६ जुलै) सकाळी सुमारे १० वाजता दुचाकीवरून लोह्याकडे येत होते. नांदेड–लातूर राष्ट्रीय महामार्गावर त्यांच्या दुचाकीमागून आलेल्या एमएच-३१-एफव्ही-४८४१ क्रमांकाच्या दुचाकीवरील एका अज्ञात व्यक्तीने त्यांना थांबवले.


त्या व्यक्तीने स्वतःला पोलिस अधिकारी असल्याचे सांगत दमदाटी केली. “माझा आवाज तुला ऐकू आला नाही का?” असे म्हणत त्याने अंगद डिकळे यांच्या हातातील सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, डिकळे यांनी प्रसंगावधान राखत आरोपीला जोरदार धक्का देऊन स्वतःची सुटका करून घेतली.



दोघांमध्ये झटापट सुरू असल्याचे पाहून परिसरातील नागरिक घटनास्थळी जमा होऊ लागले. नागरिकांची गर्दी वाढत असल्याचे लक्षात येताच आरोपीने आपली दुचाकी आणि सोबतचे गाठोडे जागीच टाकून रस्त्यालगतच्या उसाच्या फडातून पळ काढला. त्यामुळे लुटायला आलेला तोतया स्वतःच पळून जाण्याची वेळ त्याच्यावर आली.
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल परसराम लुंगारे व खंडू घोरबांड यांनी घटनास्थळी धाव घेतली. आरोपीने टाकून दिलेल्या बनावट अंगठ्या, एक ब्रेसलेट आणि दुचाकी पोलिसांनी जप्त केली. याप्रकरणी लोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपीचा शोध सुरू आहे.
आंधळेपणाने विश्वास ठेवू नका – पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव – सध्या फसवणुकीच्या घटना वाढत असल्याने स्वतःला पोलिस किंवा अन्य अधिकारी म्हणून ओळख सांगणाऱ्या कोणत्याही अनोळखी व्यक्तीवर सहज विश्वास ठेवू नये. संबंधित व्यक्तीची ओळख व सत्यता पडताळून पाहावी. कोणतीही संशयास्पद घटना आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी केले आहे.
