हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर तालुक्यातील कारला शिवारात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी धुमाकूळ घालत शेतकऱ्यांच्या शेतातील बोअर व सिंचन विहिरींमध्ये असलेल्या मोटारींचे केबल कापून पसार झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.


एकाच रात्री जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतातील ५० ते ७० फूट लांबीचे केबल चोरीला गेल्याचे समोर आले असून, मोटार स्टार्टर्स फोडून तांब्याचे केबल कापून नेल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली. सध्या रब्बी हंगाम सुरू असल्याने गहू, हरभरा, ज्वारी आदी पिकांना पाणी देण्याची अत्यंत महत्त्वाची वेळ असताना मोटारी बंद पडल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. लाखो रुपये किमतीचा केबल चोरीला गेल्याने शेतकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे.

गेल्या महिनाभरापासून बोरगडी, सिबदरा शिवारातही अशाच प्रकारच्या केबल चोरीच्या घटना घडल्या असून, तांबा विक्रीसाठीच चोरट्यांनी हा डाव आखल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तांबा कुठे व कशा पद्धतीने विकला जातो, याचा तपास करण्याची गरज असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.


बुधवारी दुपारी कारला येथील शेतकऱ्यांनी पोलीस निरीक्षक अमोल भगत यांची भेट घेऊन लेखी तक्रार दिली असून, चोरट्यांचा तात्काळ शोध घेऊन कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. ऐन सिंचनाच्या काळात अशा प्रकारे केबल चोरी होत असल्याने शेतकऱ्यांचे हाल होत असून, पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेऊन परिसरात गस्त वाढवावी, अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

या मागणीचे निवेदन पोलिस पाटील साईनाथ कोथळकर, तंटामुक्त समिती अध्यक्ष डॉ. गफार, जांबुवंत मिराशे, तुकाराम कदम, संजय मोरे, नंदकुमार मिराशे, सुभाष मोरे, बालाजी मिराशे, संभा ताटेवाड, अक्षय मोरे, गणपत यमजलवाड, शेषराव सूर्यवंशी यांच्यासह अन्य शेतकऱ्यांनी दिले आहे.

