किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट पंचायत समितीच्या माजी सभापती कलाबाई नारायण राठोड व त्याचे पती माजी पं.स. सदस्य नारायण राठोड यांनी भाजपातील अंतर्गत गटबाजीला वैतागून अखेर ऐन विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात माजी आ. प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत राष्ट्रवादीचे युवक कार्यकर्ते ईश्वर जाधव यांच्या प्रयत्नाने शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीत किनवट मध्ये भाजपाला मोठा धक्का मानला जात आहे.
ईस्लापूर ,शिवणी परिसरातील व्यंकटराव नाईक तांडा या अतिदुर्गम भागातील गावचे रहिवासी असलेले भाजपाचे जुने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून नारायण मिठू राठोड यांची या भागात ओळख होती. नारायण राठोड हे गावचे उपसरपंच, इस्लापूर बाजार समितीचे संचालक, दोन वेळा शिवणी गणातून पंचायत समितीचे सदस्य म्हणून निवडून आले होते. तर मागील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांच्या पत्नी कलाबाई नारायण राठोड या भाजपाकडून निवडून येऊन त्यांनी किनवट पंचायत समितीच्या सभापती पदाचा पदभार स्वीकारला होता. त्यांच्या या पदाच्या कालखंडात त्यांनी अनेक सामान्य नागरिकांचे प्रश्न सोडवले.
परंतु गेल्या अनेक दिवसा पासून किनवट, माहूर विधानसभा मतदार संघात भाजपातील गटबाजी मोठ्या प्रमाणावर झाल्याने निष्ठावंत कार्यकर्त्यांना काम करणे अवघड बनले होते. याच गटबाजीला वैतागून मी अखेर माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार या पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे नारायण राठोड यांनी म्हणले आहे.
भाजपाला ऐन विधानसभा निवडणुकीत हा मोठा धक्का मानला जात आहे. नारायण राठोड यांनी राष्ट्रवादी प्रवेश केल्याने त्यांच्या या प्रवेशा बाबत युवा नेते राहुल नाईक ,पत्रकार संघाचे अध्यक्ष मारोती शेळके ,माजी जि.प. सदस्या पंचफुलाबाई शिवराम जाधव, मनोज राठोड, डि.के.जाधव, सरपंच स्वप्निल राठोड ,संचालक शेख जब्बार ,पत्रकार भोजराज देशमुख, लक्ष्मण खिरू राठोड, सुंदर मुंडावरे यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.