नांदेड l नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष व शिवसेना या महायुतीमधील दोन घटक पक्षांमध्ये युतीवर शिक्कामोर्तब होण्याचे संकेत असून, या संदर्भात दोन्ही पक्षांच्या समन्वय समितीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीमध्ये युतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाली असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यामध्ये महायुतीच्या माध्यमातून मनपा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, नांदेड मनपासाठी दोन्ही पक्षांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली आहे.

या समितीमध्ये भाजपकडून महानगराध्यक्ष अमरनाथ राजूरकर, खा. अजित गोपछडे, माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, माजी महानगराध्यक्ष दिलीप कंदकुर्ते व प्रदेश कार्यकारिणी सदस्य चैतन्यबापू देशमुख यांचा समावेश आहे; तर शिवसेनेकडून आ. बालाजी कल्याणकर, आ. आनंद बोंढारकर तसेच विनय गिरडे, उमेश मुंडे, गंगाधर बडुरे या तीन जिल्हाप्रमुखांचा समावेश आहे. या समन्वय समितीची पहिली बैठक आज घेण्यात आली. या बैठकीमध्ये महायुतीतील जागा वाटपासंदर्भात प्राथमिक चर्चा झाली. ही संपूर्ण चर्चा अत्यंत सकारात्मक झाल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. जागा वाटपासंदर्भात चर्चेच्या आणखी काही फेऱ्या झाल्यानंतर अंतिम निर्णय दोन्ही पक्षांच्या श्रेष्ठींमार्फत होणार असल्याचे सांगण्यात आले.


आजच्या बैठकीत भाजपकडून माजी पालकमंत्री डी. पी. सावंत, दिलीप कंदकुर्ते, चैतन्यबापू देशमुख, तर शिवसेनेकडून विनय गिरडे, उमेश मुंडे व गंगाधर बडुरे यांनी सहभाग घेतला. बैठकीचा अधिकृत वृत्तांत जरी बाहेर आला नसला तरी बैठकीत महायुतीसंदर्भात सकारात्मक चर्चा झाल्याचे कळते.


