नांदेड| महिलांनी गृह उद्योगांबरोबरच सेवा क्षेत्रात पदार्पण करून आपली आर्थिक उन्नती साधावी, कारण सेवा क्षेत्रात सध्या मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे प्रतिपादन उद्योजक चैतन्य बापू देशमुख यांनी केले. अंबिका मंगल कार्यालय येथे सुरू असलेल्या दीपोत्सव या भव्य प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते.
याप्रसंगी ते म्हणाले की, एवढ्या मोठ्या प्रमाणात महिला आज उद्योगांमध्ये आपला ठसा उमटवीत आहेत याचा मला आनंद वाटतो. नांदेड शहरात अशा प्रकारे महिलांसाठी कार्यक्रम होत आहेत ही निश्चितच वाखाणण्याजोगी गोष्ट असल्याचे सांगून त्यांनी बी बी एन फाउंडेशनचे कौतुक केले. याप्रसंगी सौ. देशमुख म्हणाल्या की, महिलांची अशीच प्रगती झाली पाहिजे. अशा कार्यासाठी आमचे सदैव पाठबळ राहील. या प्रसंगी उद्योजक उमेश जालनेकर, श्रीपाद योगी, सुधीर देशमुख, विद्याधर कुंभोजकर यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.
महिलांच्या कौशल्याला वाव देऊन त्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी बी बी एन फाउंडेशनच्यावतीने दि.27 ऑक्टोबर पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. या प्रदर्शनात दिवाळीसाठी लागणारे खाद्यपदार्थ, पूजेचे साहित्य, गृह उपयोगी वस्तू, ज्वेलरी, गृह सजावट, गिफ्ट, साडी, ड्रेसेस, कॉस्मेटिक आणि भरपूर काही वस्तूंचे विविध स्टॉल आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनामुळे ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन खरेदीला तसेच स्थानिक उद्योजकांना वाव मिळत आहे.
या उपक्रमासाठी अमोल कंडारकर, दुर्गादास जोशी, महेश कोळेश्वर, सारंग नांदेडकर, अनिल कुलकर्णी, सुमेध पांडे,प्रणव चौसाळकर, वैभव कुलकर्णी यांच्यासह बीबीएन टीम परिश्रम घेत आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी वडवळकर यांनी केले. कार्यक्रमास महिला तसेच प्रतिष्ठित नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.