बिलोली l बिलोली नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते आणि पदवीधर भूमन्ना पिराजी नरोड यांनी “पैसा खर्च करणार नाही आणि पैसा मिळवण्यासाठी निवडणूक लढवणार नाही” असा ठाम निर्धार व्यक्त केला आहे. त्यांच्या या भूमिकेने स्थानिक राजकारणात चर्चेची नवी लाट उसळली आहे.


नरोड यांच्या या घोषणेला पाठिंबा देणाऱ्यांचे म्हणणे आहे की, निवडणूक ही मूल्यांवर आधारित असावी. पैसा आणि प्रलोभनांवर आधारलेले राजकारण समाजाचे नुकसान करते. तर दुसरीकडे काहींनी हा निर्धार वास्तवापासून दूर असल्याचे म्हणत, “आजच्या काळात पैशाविना निवडणूक लढवणे म्हणजे डिपॉझिट जप्त होण्याचा धोका” असे मत व्यक्त केले आहे.

विशेष म्हणजे भूमन्ना नरोड हे आर्थिक दृष्ट्या सुसंपन्न असून, समाजात प्रतिष्ठित मानले जातात. त्यामुळे त्यांच्या या निर्णयामागे आर्थिक मजबुरी नसून विचारांची ताकद आहे, असे समर्थक म्हणतात.


हल्लीच्या काळात निवडणूक म्हणजे ‘पैसा गुंतवा आणि नंतर पैसा कमवा’ असा व्यवहार झाला आहे. मतदारांना विकासापेक्षा तात्काळ आर्थिक लाभ — पैसे किंवा दारू — याचाच मोह अधिक वाटत असल्याने निवडणुकीचे स्वरूप बदलले आहे. अनेक उमेदवार मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पैसे खर्च करताना दिसतात.

यावर प्रतिक्रिया देताना काही नागरिकांनी सांगितले की, दिल्लीतील ‘आप’ पक्षाने आणि बिलोली नगरपरिषदेतील शिवाजीराव पाटील तसेच गंगाधरराव पटणे यांच्या काळात पैसा व दारूशिवाय निवडणुकीत यश मिळवले होते. त्यामुळे योग्य विचार आणि प्रामाणिकपणा असेल, तर पैशाशिवायही जनता साथ देऊ शकते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे की, “आज राजकारणात पैसा खर्च करा आणि नंतर सरकारी योजना, गुत्तेदारी, रेती व्यवसाय किंवा इतर मार्गांनी तो परत मिळवा” हा प्रकार सामान्य झाला आहे. या पार्श्वभूमीवर भूमन्ना नरोड यांचा निर्णय हा लोकशाहीतील नैतिकता आणि स्वच्छतेचा संदेश देणारा ठरू शकतो.
आता बिलोलीतील मतदारांनी निर्णय घ्यायचा आहे पैशाला मत द्यायचं की मूल्यांना. या निवडणुकीत भूमन्ना नरोड यांचा प्रयोग कितपत यशस्वी ठरेल, हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे.

