नांदेड l राजे मधुकरराव देशमुख हे बहुआयामी लेखक होते. त्यांना अनेक भाषा अवगत होत्या. त्यांचे शिकार या विषयावरचे लेखन अद्वितीय असून प्रत्यक्ष जंगलात भटकंती करून त्यांनी हे लेखन केले आहे. राजे देशमुख यांनी केवळ साहित्याच्याच प्रांतात कार्य केले नसून त्यांनी माहूर परिसराचा सामाजिक, राजकीय आणि शैक्षणिक अवकाश समृद्ध केला. असे प्रतिपादन मराठवाडा साहित्य परिषद शाखा नांदेडचे अध्यक्ष बालाजी इबीतदार यांनी केले.


श्री जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळाने आयोजित केलेल्या शिकारी लेखक राजे मधुकरराव देशमुख यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त उद्घाटक म्हणून ते बोलत होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष जयकुमार भोपी हे होते तर प्रमुख वक्ते म्हणून साहित्यिक देवीदास फुलारी, उद्योगपती गजानन मुधोळ पाटील, राजकुमार भोपी, कवयित्री सुधाताई नरवाडकर , कवी बापू दासरी, गुरुमाऊली लक्ष्मीबाई, स्वाती आडे आणि मुक्ता दासरी उपस्थित होते.


प्रारंभी अविनाश सातव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी देवीदास फुलारी म्हणाले , राजे मधुकरराव देशमुख यांचे लेखन हे त्यांच्या प्रत्यक्ष आणि समृद्ध अरण्य अनुभूतीवर आधारित असून त्यांच्या मधला लेखक आणि त्यांच्यामधला माणूस तेवढाच उंचीचा होता. बापू दासरी यांनी मुलांना संस्काराचे महत्त्व सांगून काही कविता सादर केल्या.


स्वर्गीय लेखक बी. रघुनाथ यांची कन्या आणि कवयित्री सुधा नरवाडकर यांनी मुलांना मार्गदर्शन करून दोन कविता सादर केल्या. उद्योगपती गजानन मुधोळ पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी मार्गदर्शन केले. स्वाती आडे यांनी विद्यार्थ्यांना शिस्तीचे महत्व सांगून अभ्यासप्रवण होण्यास सांगितले. ॲड विजयकुमार भोपी यांनी राजे मधुकरराव यांचे व्यक्तिमत्व, त्यांचे शिकारी लेखन आणि त्यांच्या मधला माणूस यावर भाष्य केले.

जगदंबा सेवा समिती सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश सातव यांनी केले तर ॲड विजयकुमार भोपी यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला विद्यार्थी अध्यापक आणि माहूर पंचक्रोशीतील रसिक मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.


