नांदेड | बदलापूर शाळेमध्ये मुलीवर लैंगिक अत्याचार झाला, ही घटना माणुसकीला काळीमा फासणारी असून या घटनेतील व इतर मुलीं व महिलांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेत आरोपीला त्वरित कार्यवाही करून फाशी देण्यात यावी, अशी मागणी महाविकास आघाडी नांदेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना दि. 24 ऑगस्ट रोजी निवेदन देऊन मागणी केली. तसेच या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त केला.
राज्यातील महिला व मुली सुरक्षित नसल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बदलापूर व इतर ठिकाणी झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने शहरातील काँग्रेस कार्यालय आणि आयटीआय महात्मा फुले यांच्या पुतळ्यासमोर या घटनेचा हाताला काळ्या रिबीन बांधून तीव्र निषेध नोंदवला. तसेच रेल्वेस्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला हार घालून या घटनेत न्याय मिळावा, अशी मागणी केली.
जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले असून बदलापूर शाळेतील बाललैंगिक अत्याचाराबरोबच राज्यात अंबरनाथ, नागपूर, अकोला, कोल्हापूर व लातूरसह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी चिमुकल्या मुलींसह महिला अत्याचाराच्या घटना समोर आल्या आहेत. ही घटना पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारे कृत्य आहे. या घटनेचा नांदेड जिल्हा महाविकास आघाडीतर्फे जाहीर निषेध व्यक्त करून सदर घटनेतील आरोपींचा शोध घेऊन त्यांना फाशीची शिक्षा देण्याची कार्यवाही करावी व अशा घटना पुन्हा घडणार नाही, असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. यावेळी आयोजित केलेल्या सभेमध्ये विविध पदाधिकार्यांनी बदलापूर घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करून राज्यामध्ये महिलांवरील व मुलींवरील होत असलेले अत्याचार त्वरित थांबवावेत अन्यथा वेगळ्या पद्धतीने महाविकास आघाडी आंदोलन करील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
यावेळी आ. मोहन हंबर्डे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष बी.आर. कदम, राष्ट्रवादी शरद पवार ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर, राष्ट्रवादी शरद पवार नांदेड शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष माधव पावडे, शिवसेना जिल्हाप्रमुख बबन बारसे, बंडू खेडकर, काँग्रेसचे शहराध्यक्ष अब्दुल सत्तार, राष्ट्रवादीचे सरचिटणीस प्रा. डी.बी. जांभरूणकर, गणेश तादलापूरकर, काँग्रेसचे कार्याध्यक्ष महेश देशमुख तरोडेकर, प्रा. मजरोद्दीन, बालासाब माधसवाड, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा रेखाताई चव्हाण, श्रावन रॅपनवाड, राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षा प्रांजली रावणगावकर, शमीम अब्दुल्ला, गंगाधर कावळे पाटील, सुभाष रायबोले, बालाजी चव्हाण, युवकचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष धनंजय सूर्यवंशी, युवकचे शहराध्यक्ष रऊफ जमीनदार, माणिक देशमुख, लक्ष्मण भवरे, रत्नाकर जोंधळे, दत्ता पाटील तळणीकर, गणेश शिंदे, मारोती चिवळीकर, अरविंद महाराज मोरे, गजानन चव्हाण, देवराव टिपरसे, अॅड. सुरेद्र घोडजकर, मीनाताई पेठवडजकर, फैजल सिद्दिकी, बालासाहेब रावणगावकर, बालाजी गाढे पाटील, बापुसाहेब पाटील, व्ही.जे. वरवंटकर, संजय शर्मा, कुमार कुर्तडीकर, शफी रहिमान, मुन्ना अब्बास, स. दीपकसिंघ, गजानन यादव, पप्पू शर्मा, रंगनाथ भुजबळ, सत्यपाल सावंत, संजय वाघमारे यांच्यासह अनेकजणांची उपस्थिती होती.
राज्यात कायद्याचा धाक उरला नाही-भगवानराव पाटील आलेगावकर
बदलापूर येथे मुलीवर झालेला अत्याचार ही घटना मन सुन्न करणारी आहे. राज्यामध्ये कायद्याचा धाक उरला नाही. त्यामुळे अशा घटना घडत आहेत काय? गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हायला हवी, लोकशाही व संविधान सक्षम करण्यासाठी कठोर पावले उचलावीत, असे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर यांनी मत व्यक्त केले.
घटनेचा निषेध-आ. मोहन हंबर्डे
महिला व मुलींवर होत असलेले अत्याचार ही बाब निंदणीय आहे. या घटनेचा काँग्रेस तीव्र शब्दात निषेध करते, असे आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी म्हटले आहे.आरोपीला अटक करा-डॉ. सुनील कदम बदलापूर घटनेमध्ये आरोपींना त्वरित अटक करून कार्यवाही करावी, अशा घटना घडणार नाहीत यासाठी सरकारने पावले उचलावीत असे शरद पवार राष्ट्रवादीचे नांदेड शहराध्यक्ष डॉ. सुनील कदम यांनी म्हटले आहे.
मुली-महिलांवर अत्याचार वाढले-माधव पावडे
महाराष्ट्र राज्यात मुली आणि महिलांवर अत्याचार वाढले आहेत. बदलापूर घटनेचा तीव्र निषेध आम्ही करतो आहे. या घटनेत आरोपीला त्वरित अटक करून फाशीची शिक्षा द्यावी, असे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी म्हटले आहे.