हिमायतनगर| शहरासह तालुक्यातील अनेक गाव परिसरात अवैद्य धंदे राजरोसपणे चालविले जात आहेत. हे सर्व अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्यात यावे अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बंटी तथा मनोज गुडेटवार यांनी केली असून, गेल्या ४ दिवसापासून ते याबाबतचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी प्रत्यक्ष मटक्याच्या बुक्कीवर जाऊन प्रसार माध्यमांना हि छायाचित्र पुरवीत आहेत. त्यामुळे हिमायतनगर शहरात सुरु असलेल्या अवैद्य धंद्यांना आवर घालण्याचे मोठे आवाहन नूतन पोलीस निरीक्षक अमोल भगत यांच्यासमोर उभे राहिले आहे. या अवैद्य धंद्याला लगाम लावण्यात नूतन पोलीस निरीक्षक यांना यश येईल का..? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
कमी गुंतवनुक करुन जास्त नफा कमावण्याच्या मानसिकतेमुळे अवैध धंद्याकडे अनेजण वळले आहेत. मटका तथा सट्टा पट्टीवर कमी पैसा लावून जादा पैसा कमावण्याकडे तरुणांचा कल अधिक वाढला आहे. कारण कल्याण, मिलन डे- नाईट मटका आणि विविध सट्टा पट्टीवर तरूणांना सव्वा रूपयात शंभर रूपये मिळविता येत आहेत. विशिष्ट क्रमांकाच्या अंदाजावर आकडेमोड करून सट्ट्याचे गणित मांडल्या जात आहे. तरुणांसोबत काही शासकीय सेवेतील कर्मचारी देखील सट्ट्याच्या आहारी गेले आहेत. परंतु या नादात पैसा मिळवण्यापेक्षा गमावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यातुनच कर्जबाजारीपणा आणि नशेच्या आहारी जाणारे तरुण अनपेक्षितपणे गुन्हेगारी कडेही वळत आहेत. त्यातच अवैद्यरित्या देशी व बनावट दारू विक्री, देशी विदेशी दारूची विक्री, जुगार अड्डे, सट्टा पट्टा, मटका, गुटखा अशा अनेक अवैध धंद्याना शहर व ग्रामीण भागात आता ऊत आला आहे. याकडे पोलिस विभागाकडून करण्यात येणारे दुर्लक्ष यामुळे अवैध धंद्यांना जणु मोकळे रानच मिळाले आहे. हिमायतनगर शहरातील विविध भागात सुरू असलेल्या या अवैध धंद्यांमुळे आता शहरातील अवैध धंद्यांना पोलिसांनी जणू काही परवानगीच दिली की काय..? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमध्ये उपस्थित केला आहे.
हिमायतनगर शहरासह तालुक्यात मौजे पोटा बु, खडकी बा., कामारी, खैरगाव, सरसम, मंगरूळ, पवना, यासह अनेक प्रमुख गावात मोठ्या प्रमाणात अवैध्य धंदे सुरु आहेत. अवैद्य धंदे करणाऱ्यांमध्ये जास्तीत जास्त सत्ताधारी नेत्यांच्या जवळचेच आहेत. त्यामुळे स्थानिक पोलीस प्रशासनाला कार्यवाही करताना मोठे अडथळे येत आहेत असे बोलले जात आहे. या धंद्यांना मोकळीक मिळावी म्हणून काही अवैद्य धंदेचालक पोलीस अधिकाऱ्यास सबंधित बिट जमादारास महिनेवारी, हप्तेवारी देवाण घेवाण करून याकडे दुर्लक्ष करण्यास भाग पाडत असल्याचे कळते. एखादी कारवाई होत असेल तर राजकीय वजनाचा वापर करून आपले धंदे राजरोसपणे चालवीत जात आहेत. शहर व ग्रामीण भागात कित्येक ठिकाणी सट्टा पट्टी दलालांनी पट्टी घेण्याचे कार्यालय चौकाचौकात लावलेले आहेत. या अवैध धंद्यांनी कित्येक कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त केले आहेत. तरीही या अवैद्य धंद्याच्या नादी लागणाऱ्यांची संख्या लक्षणीय प्रमाणात असून, कमी होण्याचे नाव घेत नाही.
अवैद्य व्यवसायाबद्दल आरडाओरड झाल्यास काही दिवसांसाठी हे व्यवसाय छुप्या पद्धतीने चालविण्यात येतात. त्यानंतर मात्र, परिस्थिती जैसे थे होत असते. परिणामी अनेक मजुरदार, शेतकरी, युवा पिढी या व्यसनाच्या आहारी जाऊन देशोधडीला लागत असून, त्यांचे कुटुंब उघड्यावर येत असल्याचे दिसून येत आहेत. म्हणून नूतन पोलीस निरीक्षकांनी या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष देऊन शहरासह तालुक्यातील सर्व प्रकारचे अवैध धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी चार दिवसापूर्वी युवा कार्यकर्ता मनोज गुड्डेटवार, यांच्यासह त्याच्या १० ते १५ सहकार्यांनी निवेदन देऊन पोलीस निरीक्षकडे केली होती.
मात्र हिमायतनगर पोलिस ठाण्यांच्या हद्दीत आत्ताही खुलेआम सर्व प्रकारचे अवैद्य धंदे सुरू असून, अवैध व्यवसाय चालविणाऱ्यावर स्थानिक पोलिस ठाण्याकडून कारवाई होत नसल्याचे दिसून येते आहे. आता जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनीच या गंभीर बाबीकडे तात्काळ लक्ष द्यावे, आणि हिमायतनगर शहर व ग्रामीण भागात सुरु असलेले संसार उध्वस्त करणारे सर्व प्रकारचे अवैद्य धंदे तात्काळ बंद करावे अशी मागणी सुजाण नागरीकातून केली जात आहे. अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून अवैद्य धंदे बंद करण्याच्या चांगल्या कामासाठी नांदेड येथील पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर वेळप्रसंगी आमरण उपोषण करणार असल्याचे मनोज गुड्डेटवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.