नांदेड| केंद्र शासनाच्या महिला व बालविकास विभागामार्फत बाल शक्ती पुरस्कार दिला जातो. प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार ज्या मुलांनी (वय 5 पेक्षा अधिक व 18 वर्षापर्यंतच्या) शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांना हा पुरस्कार दिला जातो. नांदेड जिल्ह्यातील जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव https://awards.gov.in या संकेतस्थळावर 31 जुलै 2024 पर्यंत करावेत, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी नांदेड यांनी केले आहे.
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2025 करीता केंद्र शासनाने अर्ज मागविले आहेत. हे अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळामार्फत ऑनलाईन पद्धतीने स्विकारले जाणार आहेत. ज्या मुलांचे वय 5 वर्षापेक्षा अधिक व 31 जुलै 2024 रोजी 18 वर्षापेक्षा कमी आहे व ज्या मुलांनी शिक्षण, कला, सांस्कृतिक कार्य, खेळ नाविन्यपूर्ण शोध, सामाजिक कार्य व शौर्य अशा क्षेत्रात विशेष नैपुण्यपूर्ण कामगिरी केली आहे त्यांचे प्रस्ताव वरील संकेतस्थळावर स्वत: मुले किंवा त्यांच्यावतीने राज्य सरकार, केंद्र शासित प्रदेश, जिल्हाधिकारी/जिल्हादंडाधिककारी, पंचायत राज्य संस्था, नागरी स्वराज्य संस्था, शैक्षणिक संस्था आदी अर्ज करू शकतात. राज्यातील अशा प्रकारच्या जास्तीत जास्त मुलांचे प्रस्ताव सादर करण्यासाठी आवाहन महिला व बाल विकास आयुक्तालयाने केले आहे.
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 व 8 वीसाठी विद्यार्थ्यांच्या नाव नोंदणीस अंतिम मुदतवाढ
महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळामध्ये इयत्ता 5 वी व इयत्ता 8 वी परीक्षेसाठी नव्याने प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्जासाठी अंतिम मुदतवाढ 15 जुलै पर्यंत देण्यात आली आहे. अर्ज 5 जुलै ते 15 जुलै 2024 रात्री 11.59 वाजेपर्यंत या कालावधीत स्विकारण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांनी अंतिम मुदतीत प्रवेश अर्ज करावेत, असे आवाहन महाराष्ट्र राज्य मुक्त विद्यालय मंडळाच्या प्र. सचिव शैलेंद्र पाटील यांनी केले आहे.
ऑनलाईन नावनोंदणी प्रवेश अर्ज भरण्यास व कागदपत्रे स्विकारण्यास ही अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा तपशील पुढील प्रमाणे आहे. ऑनलाईन नावनोंदणी अर्ज भरण्यासाठी शुक्रवार 5 ते सोमवार 15 जुलै 2024 रोजीच्या रात्री 11.59 वाजेपर्यंत तर शनिवार 6 ते शुक्रवार 19 जुलै 2024 या कालावधीत विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, विहित शुल्क व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेला संपर्क केंद्र शाळेमध्ये जमा करावे लागतील. बुधवार 24 जुलै 2024 रोजी संपर्क केंद्र शाळांनी विद्यार्थ्यांचे अर्ज विहित शुल्क, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळात जमा करतील. या कालावधीमध्ये मुक्त विद्यालय मंडळाच्या इयत्ता 5 वी 8 वीसाठी प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांनी अर्ज करण्यासाठी http:/msbos.mh-ssc.ac.in या संकेतस्थळाचा वापर करावा. अर्ज भरण्यासाठीच्या सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. त्या वाचून अर्ज भरण्यास सुरूवात करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.