हिमायतनगर, परमेश्वर काळे| येथील ज्येष्ठ पत्रकार तसेच नांदेड न्यूज लाईव्ह चे संपादक अनिल लक्ष्मणराव मादसवार यांची नांदेड जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या उत्तर कार्याध्यक्ष पदी नुकतीच निवड करण्यात आली असून पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीचा गौरव मानला जात आहे.


नांदेड जिल्ह्यात प्रथमच डिजिटल माध्यमाच्या रूपाने नांदेड न्यूज लाईव्ह पोर्टलची सुरूवात करून ग्रामीण ते शहरी भागांपर्यंत विश्वासार्ह आणि निर्भीड बातम्या पोहोचविण्याचे महत्त्वपूर्ण कार्य मादसवार यांनी केले आहे. वाढत्या स्पर्धेच्या आणि सोशल मीडियाच्या युगातही नांदेड न्यूज लाईव्ह ने आपली वेगळी ओळख निर्माण केली असून लोकप्रियता टिकवून सातत्याने पुढे जाण्याचा आदर्श त्यांनी घालून दिला आहे.


ग्रामीण पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी ते अनेक वर्षांपासून सातत्याने लढा देत असून पत्रकारांच्या हक्कांसाठी काम करणाऱ्या सक्रिय आवाजांपैकी ते एक आहेत. त्यांच्या या सर्वांगीण कार्याची दखल घेऊन परिषदेचे विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख यांनी त्यांच्यावर उत्तर कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली.


अनिल मादसवार यांच्या निवडीबद्दल ज्येष्ठ पत्रकार परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, दत्ता शिराणे, गोविंद गोडसेलवार, सोपान बोंपीलवार, नागेश शिंदे, पांडुरंग गाडगे, कानबा पोपलवार, दिलीप शिंदे, ज्ञानेश्वर पंदलवाड, अनिल भोरे, असद मौलाना, संजय मुनेश्वर, धोंडोपंत बनसोडे आदी मान्यवरांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

यापूर्वीही अनिल मादसवार यांना सर्वश्रेष्ठ देवर्षी नारद पुरस्कारासह अनेक मानांकनांनी गौरवण्यात आले असून, त्यांच्या समर्पित कार्याची हीच पावती असल्याचे सर्वांचे मत आहे.


