नांदेड | नांदेड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सदैव कटिबद्ध असून, नागरिकांच्या हिताच्या विविध विकासकामांना प्राधान्य दिले जाईल, असा ठाम विश्वास राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास, अपारंपारिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.


भारताच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त वजिराबाद येथील पोलीस कवायत मैदानावर आयोजित मुख्य शासकीय समारंभात पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. सकाळी ९.१५ वाजता झेंडावंदन सोहळा पार पडला.

🇮🇳 देशभक्तीपर वातावरणात कवायती व संचलन
यावेळी देशभक्तीपर गीतावर शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या शिस्तबद्ध कवायतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. पोलीस, सीआरपीएफ, दंगा नियंत्रण पथक, महिला पथक, गृहरक्षक दल, एनसीसी, स्काऊट-गाईड, डॉग स्क्वॉड, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दल, रुग्णवाहिका आदींच्या लक्षवेधी संचलनाने संपूर्ण मैदान देशभक्तीमय झाले.



या प्रसंगी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार राजेश पवार, बालाजी कल्याणकर, आनंदराव तिडके, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मेघना कावली, जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, सहायक जिल्हाधिकारी अनन्या रेड्डी, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी जिल्हाधिकारी किरण अंबेकर, स्वातंत्र्यसैनिक, त्यांच्या वारसपत्नी, ज्येष्ठ नागरिक, विविध पक्षांचे पदाधिकारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


पालकमंत्री अतुल सावे यांनी सांगितले की, नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना ६२८ कोटी ९८ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात आली आहे. रब्बी हंगामासाठी ७२७ कोटी ९३ लाख रुपये डीबीटीद्वारे वितरित करण्यात आले. महाविस्तार एआय ॲपच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बाजारभाव, हवामान माहिती मिळणार आहे. जिल्ह्यात १ लाख जलतारा तयार करून नांदेड जिल्हा पाणीदार करण्याचा संकल्प आहे.

महाराष्ट्राने सौरऊर्जेच्या क्षेत्रात गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवले असून, महावितरणने अवघ्या ३० दिवसांत ४५,९११ ऑफ-ग्रीड सौर कृषीपंप बसवून जागतिक विक्रम प्रस्थापित केल्याची माहितीही त्यांनी दिली.
नांदेड पोलीस प्रशासनाने एमपीडीए अंतर्गत ४१ कारवाया करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला असून, अवैध धंद्यांवर कारवाईसाठी ऑपरेशन फ्लश आऊट प्रभावीपणे राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांतील विजेते खेळाडू, संविधान दिनानिमित्त आयोजित निबंध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थी, योग प्रसारासाठी योगदान देणाऱ्या योगाचार्यांचा पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह व धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रविंद्र पांडागळे व अक्षय ढोके यांनी केले.

