नांदेड। नांदेडच्या आकाशवाणी केंद्रातील प्रशासकीय अधिकारी राजीव पुंडलिकराव मिरजकर हे उद्या दि.३० सप्टेंबर रोजी नियतवयोमानाने सेवानिवृत्त होत असून, त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांच्या मित्रमंडळाने व सहकार्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
१९८७ साली सांगली येथील आकाशवाणी केंद्रात लेखा विभागात त्यांची निवड स्टॉफ सलेक्शन कमिशन मधील यशस्वी परिक्षेनंतर झाली. सुरुवातीपासूनच सांस्कृतिक, सामाजिक, क्रिडा, कृषी, युवा समस्या याबद्दल विशेष रस घेणार्या राजीव मिरजकर यांनी सांगली येथून नांदेड आकाशवाणी केंद्रात १९९० साली बदली झाल्यानंतर तेंव्हापासून ते नांदेड आकाशवाणी केंद्रात कार्यरत आहेत.
सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या क्षेत्राशी निगडीत असलेल्या तसेच कला, क्रिडा, सांस्कृतिक जीवनाचा अभ्यास असलेल्या राजीव मिरजकर यांनी नांदेड आकाशवाणी केंद्र लोकाभिमूख करण्यासाठी आपल्या सर्व सहकार्यांना वेळोवेळी मदत करुन विविध मुलाखती घेतल्या आहेत. वेगवेगळ्या क्षेत्रातील अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, युवा क्षेत्रातील विविध उपक्रम यासंदर्भात त्यांनी आकाशवाणीवर प्रशासकीय अधिकारी असताना सुध्दा विविध मुलाखती घेतल्या आहेत. पर्यटनाची प्रचंड आवड असलेल्या तसेच सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमात रस असलेल्या प्रशासकीय अधिकारी राजीव मिरजकर यांनी आपल्या कामाचा ठसा वेगवेगळ्या कामातून उमटून दिला.
जनमानसात आकाशवाणीची प्रतिमा उंचावण्यासाठी त्यांनी यशस्वी उद्योजक, अधिकारी, शेतकरी यांच्याही वैशिष्ट्यपूर्ण मुलाखती घेतल्या. किसान वाणी, युवावाणी, आजचे पाहुणे या माध्यमातून प्रशासकीय काम करीत असताना देखील मान्यवरांच्या मुलाखती बोलक्या भाषेत घेवून आकाशवाणीला एक वेगळे रुप निर्माण करुन देण्याचा प्रयत्न केला. ३७ वर्षाच्या कार्यकाळात अनेक मान्यवरांशी त्यांची नाळ जुळली. सुरुवातीपासूनच अत्यंत मेहनती व कष्टाळू म्हणून त्यांची ख्याती आहे.
नांदेड शहरातील विविध क्षेत्राशी त्यांची चांगली नाळ जुळली आहे. त्यांच्या सेवानिवृत्तीबद्दल त्यांच्या वर्ग मित्रांच्या व राज्यभरात संबंध आलेल्या अधिकारी व मित्र परिवाराचा स्नेहमिलन सोहळा नुकताच पार पडला. आज दि.३० सप्टेंबर रोजी ते सेवानिवृत्त होत असून, येणार्या काळात सामाजिक, सांस्कृतिक व क्रिडा क्षेत्रात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या उर्वरित आयुष्यासाठी त्यांच्या मित्र परिवाराने त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.