छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या विमानसेवेला मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कमी प्रतिसाद आहे. तेथून विमानाने प्रवास करणारे प्रवासी दहा टक्क्यांनी कमी झाले आहेत. तरीदेखील विमान कंपन्यांनी नांदेड – मुंबई अशी विमानसेवा सुरू करण्याचे जाहीर केले आहे. मराठवाड्यात दळणवळणाच्या साधनेत यामुळे भर पडत आहे . परंतु भविष्यात नांदेड – मुंबई विमानसेवेला चांगला प्रतिसाद मिळाला नाही तर कदाचित ती विमानसेवा दीर्घकाळ चालेल की नाही, याबद्दल शंका आहे. एकीकडे वंदे भारत रेल्वेला नांदेडपर्यंत चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने छत्रपती संभाजीनगर वासियांनी याबद्दल उघड उघड टीका सुरू केली आहे. तसेच माजी केंद्रीय मंत्री डॉ. भागवत कराड यांनी नवीन वंदे भारत छत्रपती संभाजीनगर ते मुंबई अशी सुरू करण्याची जोरदार मागणी चालविली आहे . त्यामुळे त्यांच्या या मागणीला केंद्रीय स्तरावरून पाठिंबा मिळत आहे. असे झाले तर नांदेडची सुरू होणारी विमानसेवा तसेच सध्या असलेल्या नांदेड- मुंबई वंदे भारत सेवेवर बराच फरक पडू शकतो.


मराठवाड्यात आठ जिल्हे आहेत. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर तसेच नांदेड येथून देशभरात विमानसेवा उपलब्ध आहे. त्यामध्ये आणखी आनंदाची वार्ता म्हणजे आता नांदेड येथून मुंबईला 25 डिसेंबरपासून विमानसेवा सुरू होणार आहे. यामुळे नांदेड व मुंबईची खूप मोठी सोय होणार आहे. छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून हज यात्रेसाठी आंतरराष्ट्रीय विमाने चालविण्यात येत होती . मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून तीस ते चाळीस हजार रुपये अतिरिक्त दर आकारणी होत असल्याने अनेक प्रवाशांनी मुंबई येथून विमानसेवेचा लाभ घेण्यावर पसंती दर्शविली. यामुळे छत्रपती संभाजी नगर येथून गेल्या दोन वर्षात एकही प्रवासी आंतरराष्ट्रीय विमानाचे उड्डाण झालेले नाही. एअर एशिया विमान कंपनीने थायलंडला आंतरराष्ट्रीय विमान चालू करण्याचा निर्णय घेतला होता मात्र इमिग्रेशनची सुविधा न मिळाल्याने आंतरराष्ट्रीय विमानाची वाहतूक सुरू झालेली नाही. इतर शहरांसाठी छत्रपती संभाजीनगर येथून विमानसेवा सुरू आहे. परंतु अलीकडच्या काळात अहमदाबाद, नागपूर, जयपूरसाठीची विमानसेवा बंद झाल्याने त्याचा फटका मालवाहतुकीलाही बसत आहे.

छत्रपती संभाजी नगर विमानतळावरून गेल्या काही वर्षात मुंबई आणि दिल्ली शहर वगळता देशातील विविध शहरांना विमान कनेक्शन उपलब्ध करून देण्यासाठी वेगवेगळे प्रयोग करण्यात आले परंतु तोट्यात येत असल्याची विमानसेवा असे कारण सांगून या सेवा बंद करण्यात आले सदरील सेवा बंद पडल्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवाशांच्या संख्येत 10% तूट नोंदविण्यात आली विमान कंपन्यांमध्ये विमान प्रवासी वाहतुकीसाठी लागलेल्या स्पर्धेमुळे अहमदाबाद बेंगलोर हैदराबाद तसेच जयपूर या शहरांसाठी विमान कनेक्शन उपलब्ध झाले होते.


परंतु या स्पर्धेत विमान प्रवाशांना चांगली सुविधा कमी तिकीट दर मिळत असल्याकारणाने मराठवाड्यासह इतर भागातील प्रवासी छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून विमान प्रवास करीत होते. एप्रिल 2024 ते ऑक्टोबर 2024 या दरम्यान छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून चार लाख 538 प्रवाशांनी प्रवास केला होता परंतु एप्रिल 2025 ते ऑक्टोबर 2025 या काळात एकूण तीन लाख 58 हजार 792 प्रवाशांनी प्रवास केला दोन वर्षातील आकडेवारीचा अभ्यास केला असता यामध्ये 10.4% तूट नोंदविण्यात आली आहे. म्हणजेच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांची संख्या घटली आहे.

मराठवाड्याच्या बाबतीत आणखी एक आनंद वार्ता म्हणजे छत्रपती संभाजी नगर विमानतळ अधिक सुसज्ज करण्यात येणार आहे . यासाठी १३९ एकर भूसंपादन करण्यात येणार आहे .यासाठी 87 कोटी 82 लाख रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीस दिलेल्या या आर्थिक मदतीमुळे मराठवाड्यातील हवाई पायाभूत सुविधांना मोठी गती मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर विमानतळासाठी हा कोट्यवधी रुपयांचा निधी वितरित करण्यात आल्याने भविष्यात या ठिकाणी आणखी मोठ्या प्रमाणात विमानसेवेला वाव मिळणार आहे . परंतु यावर्षी येथून विमान प्रवाशांची संख्या घटल्याने ही एक चिंतेची बाब मानली जात आहे.
शिख समाजाची दक्षिण काशी म्हणून नांदेड शहराची ओळख आहे . श्री गुरुगोविंद सिंघजी यांची नांदेड येथे समाधी आहे. त्यामुळे गुरुद्वारा येथे दर्शनासाठी देशातील तसेच विदेशातील भाविक मोठ्या संख्येने नांदेडला येत असतात. परंतु नांदेड ते मुंबई अशी विमानसेवा नसल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय होत होती. परंतु अखेर नांदेड मुंबई विमानसेवेचा मुहूर्त जाहीर करण्यात आला. आता 25 डिसेंबर पासून नांदेड – मुंबई अशी विमानसेवा सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात मंगळवार, गुरुवार व शनिवारी विमानसेवा सुरू राहणार आहे. दुसऱ्या टप्प्यात सदरील सेवा आठवडाभर सुरू राहण्याचे संकेत मिळाले आहेत. स्टार एअर कंपनीची ही सेवा असून सध्या कंपनीच्या वेबसाईटवर बुकिंगला सुरुवात झाली आहे. सुरुवातीचे भाडे नांदेड- मुंबई यासाठी 3299 दाखविले जात आहे. नांदेडहून नांदेड – मुंबई विमानसेवा उपलब्ध झाल्यामुळे त्याचा फायदा हिंगोली, परभणी, लातूर व वाशिम जिल्ह्यातील प्रवाशांना मिळू शकतो. या विमानसेवेमुळे नांदेडला दळणवळणाची मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे. याचा फायदा व्यापारी दृष्टिकोनातून नांदेडला होऊ शकतो.
सध्या नांदेडच्या विमानतळावरून हैदराबाद, बेंगलोर ,पुणे अशी विमान सेवा सुरू आहे . या ठिकाणी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नांदेड- मुंबई विमानसेवा सुरू व्हावी, अशी गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होत आहे. विशेष म्हणजे नांदेड विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध आहे . त्यामुळे मराठवाड्यात ये-जा करणाऱ्या अनेक नेत्यांसाठी तसेच इतर नागरिकांसाठी नांदेडचे विमानतळ सोयीचे मानले जाते. एकीकडे छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळावर विमान प्रवाशांची संख्या दहा टक्के कमी झाली आहे तर दुसरीकडे नांदेड येथून आता नव्याने नांदेड मुंबई विमानसेवा सुरू झाल्याने ही नांदेड वासियांसाठी आनंद वार्ता आहे परंतु भविष्यात नांदेडच्या विमानतळावरून विमान कंपनीला फायदा होईल या दृष्टीने प्रवासी भेटले तरच ही सुविधा पुढे सुरू राहील अन्यथा छत्रपती संभाजी नगर येथील विमानतळावर ज्याप्रमाणे अहमदाबाद, नागपूर ,जयपूरची विमानसेवा बंद करावी लागली , तशीच अवस्था नांदेडच्या बाबतीत होऊ नये म्हणजे झालं. मराठवाड्याच्या बाबतीत विमानसेवेबद्दल बोलावयाचे झाले तर काही खुशी कही गम अशीच अवस्था असल्याचे यावरून दिसून येते.
चौकट : मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्याला तेलंगणा तसेच कर्नाटक या दोन राज्याची सीमा लागते. त्याबरोबरच विदर्भ देखील मराठवाड्यालगत नांदेड जिल्ह्यात सीमेवर असल्याने येथील प्रवाशांसाठी ही आनंदाची वार्ता ठरत आहे . या सेवेमागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यामुळेच जालना – मुंबई वंदे भारत नांदेडपर्यंत वाढविण्यात आली. मराठवाड्यातील नांदेडच्या विकासासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे असलेले विशेष लक्ष कौतुकास्पद मानले जाते.
लेखक….डॉ. अभयकुमार दांडगे, abhaydandage@gmail.com, मराठवाडा वार्तापत्र

