हिमायतनगर| हिमायतनगर (वाढोणा) शहरातील मुख्य रस्ते नगरपंचायतीने गेल्या पाच वर्षांपासून नळयोजनेच्या नावाखाली खोदून ठेवल्यामुळे अल्पसा पाऊस होताच रस्त्याने प्रवास करताना वाहन धारकांची घसरगुंडी होत असून, अनेक अपघात होत आहेत. नुकत्याच झालेल्या अपघातात एका नागरिकाचा पाय फैक्चर झाला असून, ठेकेदारसह याकामाकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली जात आहे.

हिमायतनगर येथील नगरपंचायती अंतर्गत गत सात वर्षांपूर्वी शहराची कायम स्वरूपी पाणी समस्या मिटविण्यासाठी १९ कोटी १९ लक्ष रुपयाची नळ योजना मंजूर करण्यात आली. सदरील नळ योजनेचे काम करणाऱ्या ठेकेदाराने पाईपलाईन करण्याच्या नावाखाली नव्यानेच बनविलेले कोटयावधी रुपयांचे सिमेंट काँक्रेटचे रस्ते मधोमध खोदून ठेवले. यास जवळपास पाच वर्ष झाले मात्र अजूनहि जनतेला या नळयोजनेचे कनेक्शन मिळाले नाही. तर अर्ध्याहून अधिक नागरिकांच्या घरात या नळ योजनेचे पाणी सुद्धा पोचले नाही. नळयोजनेच्या नावाखाली खोदलेल्या रस्त्याने मात्र अनेकांना अपंगत्व आणले आहे.

शहरातील बाजार चौक ते सराफ लाईन – परमेश्वर गल्लीपर्यंत तसेच शहरातील १७ प्रभागातील सर्वच गल्लीबोळातील रस्ते खोदल्याने अल्पसा पाऊस होताच रस्त्यावर चिखल निर्माण होत आहे. त्यातच नाल्याची साफसफाई थातुर माथूर केल्याने नालीचे दुर्गंधीयुक्त घाण पाणी थेट रस्त्यावर आल्याने नागरिकांची घसरगुंडी होते आहे. दिवसागणिक अनेक दुचाक्या स्लिप होऊन अपघात होत आहेत, तर पादचारी देखील पाय घसरून पडत आहेत. याकडे नगरपंचायत स्वच्छता विभागासह संबंधीत बांधकाम अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरीकातून केला जात आहे.



आता मान्सूनपूर्व पाऊसाने नगरपंचायतीच्या निष्क्रियतेची पोल खोललाई असून, नगरपंचायतीने आगामी पावसाळा लक्षात घेऊन तातडीने नळयोजनेसाठी खोदून ठेवलेल्या नालीमध्ये डस्ट टाकून तात्पुरती का होईना नागरिकांची रस्त्यासाठी होणारी गैरसोय दूर करावी जेणेकरून अपघात होणार नाहीत. तसेच रस्त्यावर येणारे नळीतील दुर्गंधीयुक्त घाण पाण्याची कायम विल्हेवाट लावन्यासाठी स्वच्छता विभागाच्या संबंधीतांनी नाले सफाईकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली जाते आहे.

रविवारी हिमायतनगर शहरातील तुकाराम मुधोळकर नावाचे व्यक्ती दुचाकीवरून जाताना त्यांची दुचाकी सोनार लाईन मधील हेंद्रे टिव्ही रिपेयरिंग दुकान समोर स्लिप होवून अपघात झाला. यावेळी नागरिकांनी त्यांना उचलून रुग्णालयात नेले, पाय फ्रॅक्चर झाल्याने नांदेड येथील व्यंकटेश्वरा हास्पिटल मध्ये ऑपरेशन करण्यात आले. जर या रस्त्याच्या दयनीय अवस्थेने मला अपंगत्व आल्यास कोण..? जिम्मेदार असा प्रश्न त्यांनी सोशल मीडियावर उपस्थित केला आहे. तर जागरूक शहरातील नागरिकांनी वारंवार होणाऱ्या अपघात आणि रस्ते, नाल्याच्या दुर्गंधीने होणाऱ्या गैरसोयींबद्दल संबंधित ठेकेदार आणि याकडे दुर्लक्ष करणाऱ्या नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी केली आहे.
