देगलूर, गंगाधर मठवाले| देगलूर तालुक्यातील शेळगाव (नृसिंह) येथे रविवारी रात्री घडलेल्या धक्कादायक घटनेत २८ वर्षीय तरुणाचा एका अल्पवयीन मुलाने धारदार चाकूने गळ्यावर व पाठिवर वार करून खून केल्याने परिसरात भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी आरोपीला तात्काळ ताब्यात घेतले असून या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.


घटनेचा तपशील
रविवार (दि. २८ सप्टेंबर) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास संतोष परमेश्वर माटलवार (वय २८, रा. शेळगाव) हा आपला भाऊ व दोन मित्रांसोबत ग्रामपंचायत जवळील घराजवळ ओट्यावर गप्पा मारत बसला होता. याचवेळी गावातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलगा तेथे आला. “माझ्या बहिणीच्या पाठीमागे लागू नको” असा जाब देत त्याने संतोषवर संताप व्यक्त केला.



पूर्वीही याच संशयावरून त्यांच्यात वाद झाले होते. त्याच रागातून आरोपीने कमरेला खोचलेला धारदार चाकू काढून संतोषच्या गळ्यावर व पाठिवर जबर वार केले. यात संतोष गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात कोसळला.


उपचाराआधीच मृत्यू
गंभीर जखमी अवस्थेत संतोषला तातडीने देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.

गुन्हा नोंद
या प्रकरणी मयताचा भाऊ अर्जुन माटलवार (वय ३५) यांच्या फिर्यादीवरून देगलूर पोलिस ठाण्यात गुन्हा क्र. ४७८/२०२५, कलम १०३ (१) भारतीय न्याय संहिता अंतर्गत नोंदवला आहे. घटनेनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत गोसावी व पोलिस निरीक्षक मारुती मुंडे यांनी घटनास्थळी पाहणी केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नरहरी फड करत आहेत. या निर्घृण हत्येमुळे देगलूर तालुक्यात भीती व संतापाचे वातावरण पसरले आहे.


