हिमायतनगर, अनिल मादसवार| हिमायतनगर नगरपंचायत निवडणुकीनंतर सुरू असलेल्या राजकीय हालचालींना आता वेग आला असून, डॉ. राजेंद्र वानखेडे यांना स्वीकृत सदस्य पदाची लॉटरी लागल्याने शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या अनपेक्षित घडामोडीमुळे काँग्रेस पक्षाचे उपनगराध्यक्ष व स्वीकृत सदस्य कोण होणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.


नगरपंचायत निवडणुकीत सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी निवडणूक प्रतिष्ठाची बनवत जोरदार ताकद लावली होती. या निवडणुकीत माजी आमदार माधवराव पाटील जळगावकर यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने नगराध्यक्ष पदासह सर्वाधिक नगरसेवक निवडून आणत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. मात्र, निवडणुकीनंतर स्वीकृत सदस्य पदासाठी झालेल्या लॉटरीत डॉ. राजेंद्र वानखेडे यांच्या नावाची निवड झाल्याने समीकरणे बदलली आहेत.

डॉ. राजेंद्र वानखेडे हे डॉक्टर असोसिएशनचे तालुकाध्यक्ष असून, त्यांनी नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून निवडणूक लढवली होती. मात्र, मतदारांनी त्यांना नाकारले. तर काँग्रेसचे रफिक सेठ मोठया फरकाने निवडून आले. त्यानंतर भाजपा शिवसेना युती होऊन डॉ राजेंद्र वानखेडे यांना स्वीकृत सदस्य म्हणून संधी देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांच्याकडे प्रस्ताव देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे.


काँग्रेसकडे नगरपंचायतमध्ये स्पष्ट बहुमत असल्याने दिनांक 15 जानेवारी रोजी होणारी उपनगराध्यक्ष पदाची निवड काँग्रेसकडेच जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. या पदासाठी काँग्रेसच्या वॉर्ड क्रमांक 2 चे युवा नगरसेवक विनोद गुंडेवार यांना संधी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. युवा नेतृत्वाला पुढे आणण्याच्या भूमिकेतून काँग्रेस पक्ष हा निर्णय घेईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

भाजप – शिवसेना (शिंदे गट) ला निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याने निवडणुकी नंतर युती करत स्वीकृत सदस्य पदासाठी डॉ. राजेंद्र वानखेडे यांचे नावं पुढे केल्याने नगरपंचायत राजकारणात सक्रिय भूमिका मिळणार असल्याचे चित्र दिसत आहे. तर काँग्रेसकडून आणखी एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याची संधी असल्याने अनेक इच्छुकांनी लॉबिंग सुरू केल्याचे बोलले जात आहे. नेमकी संधी कोणाला मिळणार, याकडे संपूर्ण हिमायतनगर शहराचे लक्ष लागले आहे.
डॉ. वानखेडेंना मिळालेल्या स्वीकृत सदस्य पदामुळे नगरपंचायत राजकारणात नवे समीकरण तयार होणार की..? सत्ताधारी काँग्रेस आपली पकड आणखी मजबूत करणार? याचे उत्तर लवकरच मिळणार आहे.

