हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार| हिमायतनगर शहरातील परमेश्वर गल्ली परिसरात असलेल्या जय हनुमान बेकरी अँड केक सेंटरला शनिवार, दि. 21 डिसेंबरच्या मध्यरात्री अचानक शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले असून संबंधित दुकानदाराचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.


आग लागल्याची माहिती मिळताच हिमायतनगर नगरपंचायतीचे अग्निशामक वाहन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, शेजारील पाजारी व मित्रमंडळाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात आणण्यास मोठी मदत झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेबाबत संचालक हनुमान अरेपल्लू यांनी सांगितले की, ही आग केवळ शॉर्टसर्किटमुळे लागली असून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. मात्र, आगीत संपूर्ण दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कुटुंबावर आर्थिक संकट ओढावले आहे.



घटनेचे गांभीर्य लक्षात घेता, संबंधित वीज वितरण कंपनीकडून तात्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी घटनास्थळी उपस्थित नागरिकांकडून करण्यात येत आहे. तसेच शहरातील व्यापाऱ्यांनी व प्रशासनानेही या नुकसानग्रस्त दुकानदाराला मदतीचा हात द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

