हिमायतनगर, अनिल मादसवार| जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रभर राबविण्यात येणाऱ्या “जीवनदान महाकुंभ २०२६” अंतर्गत बुधवार, दि. ७ जानेवारी रोजी हिमायतनगर शहरातील श्री परमेश्वर मंदिर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरास शहर व ग्रामीण भागातील महिला, पुरुष, युवक व युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन श्री परमेश्वर मंदिर कमिटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ व नगराध्यक्ष शेख रफिक शेख महेबूब यांच्या हस्ते विधिवत पूजन करून करण्यात आले. यावेळी मान्यवरांचे पुष्पहार घालून स्वागत–सत्कार करण्यात आला तसेच शिबिरास उपस्थित राहिल्याबद्दल आयोजकांच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले.
हे शिबिर तालुका सत्संग समिती व तालुका सांप्रदाय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले होते. दरवर्षीप्रमाणे यंदाही जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर हा उपक्रम राबविण्यात येत असून, पंधरा दिवस चालणाऱ्या जीवनदान महाकुंभ उपक्रमातून अपघातग्रस्त, गंभीर आजाराने ग्रस्त तसेच तातडीच्या उपचारांची गरज असलेल्या रुग्णांना विनामूल्य रक्तपुरवठा करण्याचे महत्त्वपूर्ण सामाजिक कार्य केले जात आहे.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान असून रक्तामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात, या उदात्त भावनेतून मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी या पवित्र कार्यात सहभाग नोंदविला. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी शहरातील आजी-माजी पदाधिकारी, मंदिर कमिटीचे संचालक, सामाजिक कार्यकर्ते तसेच स्वयंसेवकांनी परिश्रम घेतले. कार्यक्रम सामाजिक बांधिलकी व मानवतेचा संदेश देणारा ठरला.
