हिमायतनगर,अनिल मादसवार| हिमायतनगर शहरापासून ४ किमी अंतरावर असलेल्या बोरि/घारापूर शिवारात दि.०६ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास कुत्र्याच्या तावडीत सापडलेल्या हरणाच्या पाडसावर प्रथमोपचार करून वनविभागाच्या स्वाधीन करण्यात आले आहे. शेतकऱ्याची समयसूचकतेमुळे चिमुकल्या हरणाच्या पाडसाला जीवदान मिळाले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे कि, दि.०६ शनिवारी सकाळी तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या सरसम वनपरिक्षेत्राच्या बोरि/घारापूर परिसरात सकाळच्या प्रहरी हरणांचे कळप फिरत होते. दरम्यान कळप पुढे गेल्याने चिमुकलं हरणाचा पाडस पाठीमागे राहिले. त्या पाडसाचा परिसरातील कुत्र्यांनी पाठलाग सुरु केला जीवाच्या आकांताने पाडस सैरावैरा पळत सुटले. मात्र कुत्र्यांनी पाडसावर हल्ला करून जखमी केले. हा प्रकार युवा शेतकरी संतोष देवराय माने यांच्या लक्षात येताच त्यांनी कुत्र्याच्या तावडीतून हरणाचा पाडसाची सुटका केली.
घाबरलेल्या हरणाच पाडस गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाले होते. जखमीची पाडसाची अवस्था लक्षात घेता समयसूचकता दाखवीत शेतकरी युवकाने याचं ठिकाणी असलेल्या ढाबा चालक रामदास रामदिनवार यांच्या मदतीने तत्काळ हिमायतनगर शहरातील पशुवैद्यकीय रुग्णालयात आणले. पशुधन विकास अधिकारी उमेश सोनटक्के यांनी हरिणाच्या पाडसाच्या अंगावर झालेल्या जखमेवर मलमपट्टी करून प्रथमोपचार केले. आणि वनविभागाकडे सुपूर्द करण्याचा शेतकरी युवकास सल्ला दिला. त्यावरून युवकांनी हिमायतनगर वनविभागाचे वनपाल अमोल कदम यांच्याशी संपर्क असाधून जखमी झालेल्या हरिणाच्या पाडसाला सरसम वनपरिक्षेत्राचे वनपाल यांच्या स्वाधीन केले असल्याचे सांगितले. एकूणच शेतकरी युवकांच्या समयसूचकतेमुळे हरणाच्या पाडसाचे प्राण वाचले आहे.
मात्र उपचारा नंतर हरीण पाडसाची प्रकृती कशी आहे, त्यास कळपात सोडण्यात आले काय..? याबाबतीत माहिती घेण्यासाठी सरसम वनपरिक्षेत्राचे वनपाल श्री चाटसे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही.