नांदेड l 2024-2025 मध्ये MPDA ची 2+स्कीम अंतर्गत 39 वी कारवाई अविनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी नांदेड शहरात तसेच जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नांदेड जिल्हयातील गुन्हे अभिलेखावरील सक्रिय तसेच वारंवार गुन्हे करणारे सराईत आरोपीची यादी 2+ स्किम अंतर्गत तयार करुन, आरोपी विरुध्द प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंबंधाने सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांना सुचना दिलेल्या आहेत. नांदेड जिल्हयातील गुन्हेगांरावर वारंवार प्रतिबंधात्मक कार्यवाही करुन देखील त्यांचे वर्तणात सुधारणा होत नसल्याने नांदेड जिल्हयातील सर्व पोलीस ठाणेदाराकडून सराईत गुन्हेगाराना स्थानबध्द करण्यासंबंधाने एमपीडीए प्रस्तावाची कार्यवाही चालु आहे.


नांदेड जिल्ह्यामध्ये शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी, एमपीडीए अंतर्गत सन 2024 मध्ये एकुण 13 रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराना कारागृहामध्ये “स्थानबध्द” करण्यात आले असून सन 2025 या चालू वर्षांमध्ये 26 सराईत गुन्हेगारास कारागृहामध्ये “स्थानबध्द” करण्यात आले आहे. त्याचबरोबर अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सन 2024-25 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे एकुण 107 गुन्हेगारांना हद्दपार केले आहे. तसेच सन 2025 मध्ये महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 प्रमाणे एकूण 22 गुन्हेगारांना हद्दपार करण्यात आले आहे.


सर्व सामान्य, शांतता प्रिय नागरीकांना त्रास देणारे उपद्रवी गुन्हेगारांवर पोलीसांची बारकाईने नजर असून अशा गुन्हेगारांवर “स्थानबध्द” सारखी कठोर कार्यवाही करण्यात येत आहे. स्थानबद्ध करण्यात आलेला गुन्हेगार विवेक विद्यासागर गजभारे वय 20 वर्षे व्यवसाय बेकार रा. सुजाता बौद्ध विहार जवळ वसरणी ता.जि.नांदेड याचे विरुद्ध अवैध रित्या अग्नीशस्त्र ताब्यात बाळगणे,अवैध रित्या शस्त्र ताब्यात बाळगणे व त्याचा वापर करणे, दुखापत करणे, गंभिर दुखापत करणे, जबरी चोरी करणे असे गंभिर स्वरुपाचे गुन्हे दाखल असल्याने श्री ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण, नांदेड यांनी, नमुद गुन्हेगारांस एमपीडीए अधिनियमा प्रमाणे स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव मा. पोलीस अधीक्षक, नांदेड यांचेकडे सादर केला होता.


प्रस्तावांमध्ये काही उणीवा राहणार नाहीत या करीता उदय खंडेराय, पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, नांदेड यांनी महत्वपुर्ण कामकाज पाहीले आहे. नांदेड जिल्ह्यातील विविध पोलीस स्टेशन अंतर्गत सराईत पणे गुन्हे करणारे 150 पेक्षा अधिक गुन्हेगाराची गुन्हेगारी रेकॉर्ड प्रमाणे त्यांच्यावर विविध कायद्याअंतर्गत योग्य ती प्रतिबंधात्मक कार्यवाही प्रस्तावीत आहे.

अबिनाश कुमार, पोलीस अधीक्षक, नांदेड यांनी सदर एमपीडीए प्रस्तावामधील गुन्हेगारास एक वर्षाकरीता स्थानबध्द करण्याबाबतची शिफारस मा. जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे केली होती. त्यावरुन मा. श्री. राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांनी सदर प्रस्तावातील नमुद गुन्हेगारास एक वर्षाकरीता मध्यवर्ती कारागृह, छत्रपती संभाजीनगर येथे एमपीडीए कायद्याअंतर्गत स्थानबध्द करण्याबाबतचे दिनांक 14/10/2025 रोजी आदेश पारीत केले आहेत.
या प्रकरणी पोलिस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक व्यंकट कुसमे व अंमलदार वसंत केंद्रे,शिवानंद तेजबंद , विठ्ठल भिसे,गवेद्रं शिरमवार यांनी सदरील कार्यवाही केली आहे.


