हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार | तालुक्यातील कामारी येथील शेतकरी रामदास गणपतराव शिरफुले यांच्या मालकीचा बैल बुधवारी सायंकाळी झालेल्या अवकाळी पावसादरम्यान विजेच्या झटक्याने ठार झाला. या घटनेत शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


गेल्या चार दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यात अवकाळी पावसाचे प्रमाण वाढले असून विजांचा गडगडाट सुरू आहे. सोमवारपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या वेचणीला आलेल्या कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कापूस शेतातच गळून पडला असून शेतकरी संकटात सापडले आहेत.


बुधवारी रात्री पुन्हा विजांचा कडकडाट व अतिवृष्टी सदृश्य पावसामुळे शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचवेळी कामारी शिवारात विज पडून शिरफुले यांच्या बैलाचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासनाने जागेवर पंचनामा करून अहवाल सादर केला आहे. शेतकऱ्यांनी नैसर्गिक आपत्ती विभागाकडून तातडीने नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे.




