हिमायतनगर (अनिल मादसवार) तहसील कार्यालय व पंचायत समितीतील अनेक कर्मचारी हे कार्यालयीन वेळेचे उल्लंघन करून कामचुकार वृत्तीने काम करत असल्याची बाब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या हिमायतनगर तालुका अध्यक्ष वामनराव पाटील मिराशे (वडगावकर) यांच्या निदर्शनास आली असून, त्यांनी या निष्काळजी कर्मचाऱ्यांना गंभीर इशारा दिला आहे.



शहराध्यक्ष अमोल पाटील धुमाळे व कार्याध्यक्ष अभिलाष जयस्वाल यांच्या उपस्थितीत बोलताना वामनराव पाटील म्हणाले की, “तहसील कार्यालय आणि पंचायत समितीतील अनेक कर्मचारी रेल्वेच्या वेळेनुसार ये-जा करत असून, ग्रामीण भागातील नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. काही कर्मचारी कार्यालयीन वेळेत टेबलावर दिसत नाहीत, तर काही दुपारी तीननंतर गायब होतात.”



ते पुढे म्हणाले, “यापुढे कोणी कर्मचारी वेळेवर हजर राहिला नाही, तर त्याचे स्वागत ‘बेशरमाच्या फुलाने’ करण्यात येईल, आणि जो कर्मचारी वेळेवर उपस्थित राहील त्याचे स्वागत ‘गुलाबाच्या फुलाने’ करून गांधीगिरीच्या पद्धतीने जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल.” या घोषणेमुळे तहसील कार्यालय व पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगली असून, नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या या उपक्रमाचे स्वागत केले आहे.





