नांदेड| तालुक्यातील मौजे जैतापूर तालुका नांदेड येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाऊसाहेब बराटे यांचे सूचनेनुसार उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड दत्तकुमार कळसाईत यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय नांदेड यांच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त कृषी वारकरी दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीमध्ये गावातील महिला व पुरुष वारकरी भजनी मंडळ, कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी व शाळेतील विद्यार्थी यांचा सहभाग होता. यांच्यासोबत कृषी विभागातील विविध योजनेचे फ्लेक्स, माहितीपत्रक, पताका घेऊन हरिनामा सोबत कृषी विभागातील योजनांच्या घोषणा देत दिंडी संपूर्ण गावभर फिरून दिंडी काढण्यात येऊन कृषी योजनांचा जागर करण्यात आला.व शेवटी दिंडीचे शेतकरी मेळाव्यात रूपांतर करण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी नांदेड सिद्धेश्वर मोकळे यांनी कृषी वारकरी दिंडी, कृषी योजनांचा जागर या कार्यक्रमाच्या प्रयोजनाविषयी प्रास्ताविकातून माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी नांदेड दत्तकुमार कळसाईत यांनी अध्यात्माची शेती जोड दिल्यास आपण आपल्या गावामध्येच विठुरायाचे तीर्थ निर्माण करू शकतो, पती-पत्नी ही जोडी एक विठ्ठल रुक्मिणीचे प्रति रूप आहे असे सांगून आपण आपल्या गावाचा एकोप्याने , एकजुटीने विकास घडवून आणू शकतो. गावात तीर्थ बनू शकतो असे सांगून कृषी विभागातील विविध योजनांविषयी शेतकऱ्यांना माहिती दिली. व विविध योजनेचा लाभ घेण्याविषयी आव्हान केले.
कृषी विज्ञान केंद्र पोखरणी येथील शास्त्रज्ञ संदीप जायभाये यांनी सद्यस्थितीतील सोयाबीन, कापूस व खरीप हंगामातील इतर पिकावर येणाऱ्या विविध किडी रोगाच्या व्यवस्थापना विषयी सखोल असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसंत जारीकोटे यांनी केले तर बारसे डी एन यांनी आभार प्रदर्शन केले.
कृषी वारकरी दिंडीमध्ये गावातील सरपंच , उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष त्याचबरोबर गावातील वारकरी भजनी मंडळ, महिला भगिनी तसेच कृषी विभागातील अधिकारी, कर्मचारी, शाळेतील विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदवून देहभान हरपून टाळ वाजविणे, फुगडी खेळणे ,पावले खेळणे, गोल रिंगण करणे यातून विठुरायाचे नामस्मरण करून अध्यात्मातून आत्मिक आनंद मिळविला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जैतापूर गावचे कृषी सहाय्यक बालाजी होनवडजकर, सरपंच आनंद जाधव आदींनी परिश्रम घेतले. सदरील दिंडीमध्ये मंडळ कृषी अधिकारी लिंबगाव सतीश सावंत, कृषी पर्यवेक्षिका श्रीमती सुप्रिया शिंदे , कृषी सहाय्यक संभाजी वाघमारे, दत्ता भुते, श्रीमती आश्विनी वासलवार, वनिता मोरताडे, दिपाली मोरे ,अनिता मोरे, गंगासागर क्षीरसागर आदींसह गावातील नागरिक यांची उपस्थिती मोठ्या प्रमाणात लाभली.