हिमायतनगर, अनिल मादसवार | हिमायतनगर शहराच्या पश्चिमेस हाकेच्या अंतरावर असलेल्या निसर्गरम्य कनकेश्वर तलावाच्या परिसरात उंच टेकडीवर विराजमान असलेले इच्छापूर्ती श्री वरद विनायक मंदिर हे गणेशभक्तांचे श्रद्धास्थान म्हणून विशेष प्रसिद्ध आहे. पौराणिक आख्यायिका, प्राचीन मूर्ती, निसर्गरम्य परिसर आणि भक्तांच्या श्रद्धेचा संगम असलेल्या या देवस्थानाला गणेशोत्सव काळात विशेष धार्मिक महत्त्व प्राप्त होते. गणेशोत्सव, अंगारकी चतुर्थी, संकष्टी चतुर्थी आणि श्रावण महिन्यात विदर्भ व मराठवाड्यातील हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात.


पांडवकालीन आख्यायिकेशी जोडले गेलेले कनकेश्वर
कनकेश्वर तलावाबाबत स्थानिक पातळीवर पांडवकालीन आख्यायिका सांगितली जाते. महाभारतकालीन युद्धानंतर पांडवांनी वारणावती परिसरात वास्तव्य केले होते, अशी श्रद्धा आहे. त्याच काळात पांडवांनी या तलावाला ‘ॐ’ आकार दिला, तर द्रौपदीने तलावात शुभ्र कमळांची लागवड करून मंदिर परिसर सुशोभित केला, अशी स्थानिक आख्यायिका आहे. याच श्रद्धेमुळे कनकेश्वर तलाव आणि वरद विनायक मंदिर परिसराला धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. तलावाच्या परिसरातील उंच टेकडीवर असलेले मंदिर जणू चंद्राच्या बिंबावर विराजमान असल्याचा भास निर्माण करते.


वारणावती ते हिमायतनगर… इतिहासाच्या पाऊलखुणा – स्थानिक इतिहासाच्या कथनानुसार, सध्याच्या हिमायतनगर शहराला पूर्वी वारणावती म्हणून ओळखले जात होते. पुढे येथे गौंड राजवटीचे अस्तित्व आले आणि शहराचे नाव वाढोणा करण्यात आले. राजे शामबहादूर यांनी वाढोणा शहराला जिल्ह्याचा दर्जा देऊन येथून प्रशासनाचा कारभार पाहिला, अशी स्थानिक ऐतिहासिक माहिती सांगितली जाते.
नंतर निजामशाहीच्या काळात हिमायतअली नावाचा सरदार या परिसरात आला. त्याच्या स्वागतानंतर शहराचे नाव पुढे हिमायतनगर झाले, अशी स्थानिक आख्यायिका प्रचलित आहे. त्यामुळे हिमायतनगरच्या इतिहासात वाढोणा आणि वारणावती या नावांच्या पाऊलखुणा आजही श्रद्धा व लोककथांमधून जिवंत आहेत.



दीडशे वर्षे लिंबाच्या झाडाखाली जपली मूर्ती – निजामकालीन परिस्थितीत मंदिरांच्या सुरक्षेबाबत निर्माण झालेल्या संकटामुळे वरद विनायकाची प्राचीन मूर्ती सुरक्षित ठेवण्यासाठी ग्रामस्थांनी ती लिंबाच्या झाडाखाली कंबरेइतक्या खोल खड्ड्यात जपून ठेवली होती, अशी स्थानिक श्रद्धा आहे. तब्बल दीडशे वर्षे ही मूर्ती त्याच ठिकाणी ऊन, वारा आणि पावसाचा सामना करत राहिली, अशी आख्यायिका सांगितली जाते.
सन १९७८ मध्ये अवतारी पुरुष म्हणून मानले जाणारे संत पाचलेगावकर महाराज यांनी या परिसराला भेट दिल्यानंतर ग्रामस्थांनी कनकेश्वर तलाव आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराचा संकल्प केला. गावातील गणेशभक्त तसेच परिसरातील शेतकऱ्यांनी श्रमदानातून या कार्याला हातभार लावला.
गणेश मंडळाच्या युवकांनी उभारले मंदिर
जीर्णोद्धाराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी पुढील काळात नांदेड जिल्हा परिषदेचे तत्कालीन बांधकाम सभापती प्रताप देशमुख सरसमकर यांच्या सहकार्याने तसेच गुरुवर्य लाखने महाराज आणि कांतागुरु आजेगावकर यांच्या पुढाकारातून मंदिर बांधकामाला सुरुवात झाली.
यामध्ये छत्रपती शिवाजी गणेश मंडळाच्या युवकांनी गणेशोत्सवातील अनावश्यक खर्चाला फाटा देत उपलब्ध रक्कम मंदिरासाठी वापरली. लोकवर्गणी, श्रमदान आणि मजुरीची बचत अशा विविध माध्यमातून निधी उभारून उंच टेकडीवर वरद विनायकाचे मंदिर उभारण्यात आले.
प्राचीन अष्टभुजाधारी वरद विनायकाची विशाल मूर्ती मोठ्या प्रयत्नांनी टेकडीवरील मंदिरात नेऊन विधिवत प्रतिष्ठापना करण्यात आली. आजही ही मूर्ती भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, नवसाला पावणारा आणि इच्छा पूर्ण करणारा गणपती म्हणून भक्तांमध्ये तिची विशेष मान्यता आहे.
गणेशोत्सवात पूजा, महाभिषेक आणि महाप्रसाद – गणेशोत्सव पर्वात वरद विनायक मंदिरात विशेष पूजा-अर्चना, महाभिषेक तसेच महाप्रसादाचे आयोजन केले जाते. दर्शनासाठी येणारे भाविक मनोभावे नवस बोलतात. अनेक भक्तांना वरद विनायकाच्या दर्शनानंतर मनोकामना पूर्ण झाल्याचा अनुभव आल्याचे सांगितले जाते.
दर महिन्याची अंगारकी चतुर्थी, गणेश चतुर्थी, संकष्टी चतुर्थी, श्रावण मास आणि गणेशोत्सवाच्या काळात मंदिरात भाविकांची मोठी गर्दी होते. विशेषतः शनिवारच्या संकष्टी चतुर्थीला हिमायतनगरसह विदर्भ आणि मराठवाड्यातील विविध भागांतून भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल होतात.
‘ॐ’ आकाराचा तलाव आणि शुभ्र कमळांचे आकर्षण
कनकेश्वर तलाव हे या देवस्थानाच्या निसर्गसौंदर्यात भर घालणारे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. पावसाळ्यात तलावात साचलेल्या पाण्यामध्ये शुभ्र कमळे उमलताना दिसतात. तलाव, कमळे, हिरवाई आणि उंच टेकडीवरील मंदिर यामुळे संपूर्ण परिसराला नयनरम्य रूप प्राप्त होते. मात्र यंदा पावसाने पाठ फिरवल्याने कनकेश्वर तलावात अल्प पाणी आहे. परिणामी तलावातील पाणी आणि शुभ्र कमळांचे नैसर्गिक दृश्य लोप पावले असून, गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना या निसर्गसौंदर्यापासून वंचित राहावे लागत आहे.

धार्मिक पर्यटन विकासाची गरज – श्रीक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या हिमायतनगरच्या वरद विनायक मंदिरासोबतच पांडवकालीन कनकेश्वर तलावाचा शाश्वत विकास करण्याची मागणी आता भाविकांमधून जोर धरत आहे. तलावाचे सुशोभीकरण, जलसंधारण, परिसरात वृक्षारोपण, स्वच्छता, भाविकांसाठी मूलभूत सुविधा आणि धार्मिक पर्यटनाच्या दृष्टीने आवश्यक विकासकामे झाली मात्र आणखी परिसराचा भरपूर विकास व सौंदर्यकरण झाल्यास या परिसराला मोठी पर्यटनस्थळ म्हणून ओळख मिळू शकते.
नवसाला पावणारा वरद विनायक, पांडवकालीन आख्यायिकेशी जोडलेला कनकेश्वर तलाव आणि निसर्गरम्य टेकडी—या त्रिवेणी संगमामुळे हिमायतनगर (वाढोणा) शहराचे हे देवस्थान गणेशभक्तांसाठी श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा अनुभव देणारे धार्मिक पर्यटनस्थळ ठरत आहे.

