सांगली, प्रतिनिधी| अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार, संपादक व सिद्धहस्त लेखक शिवराज काटकर यांची निवड झाली असून, सांगली येथे झालेल्या भव्य-दिव्य सोहळ्यात त्यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली. महाराष्ट्रासह देशभरातील पत्रकारांचे लक्ष वेधून घेणाऱ्या या सोहळ्याला ६०० पेक्षा अधिक पत्रकारांची उपस्थिती होती.



पत्रकारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढणाऱ्या आणि पत्रकारिता क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या शिवराज काटकर यांच्यावर आता परिषदेची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सांगली जिल्ह्याला प्रथमच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्षपद मिळाल्याने जिल्ह्यातील पत्रकारांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.



दिग्गज पत्रकारांच्या परंपरेचा वारसा – अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद ही पत्रकारांच्या संघटनात्मक शक्तीचे प्रतिनिधित्व करणारी देशातील अग्रगण्य पत्रकार संघटना आहे. महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील ३५४ तालुक्यांमध्ये परिषदेच्या शाखा कार्यरत असून, महाराष्ट्राबाहेरही दिल्ली, पणजी, बेळगाव, विजापूर, इंदूर, हैदराबाद आदी ठिकाणी परिषदेचे कार्य विस्तारले आहे. देशभरातील सुमारे ११ हजार पत्रकार परिषदेशी जोडले गेले आहेत. आचार्य अत्रे, पा. वा. गाडगीळ, अनंत भालेराव यांसारख्या दिग्गज पत्रकारांनी ज्या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले, त्या गौरवशाली परंपरेत आता शिवराज काटकर यांच्या नावाची भर पडली आहे.




पत्रकारांच्या प्रत्येक लढ्यात सक्रिय सहभाग – शिवराज काटकर हे बेळगाव तरुण भारतच्या सांगली आवृत्तीचे संपादक आहेत. पत्रकारिता आणि सामाजिक चळवळीशी त्यांचे घट्ट नाते असून, पत्रकारांच्या विविध प्रश्नांसाठी झालेल्या आंदोलनांमध्ये त्यांनी सातत्याने सक्रिय सहभाग घेतला आहे.
हाडाचे पत्रकार आणि सिद्धहस्त लेखक म्हणून परिचित असलेल्या काटकर यांनी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात पत्रकारांसाठी प्रशिक्षण शिबिरे, मार्गदर्शनपर उपक्रम आणि विविध संघटनात्मक कार्यक्रम राबविले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या वडिलांचाही परिषदेच्या कार्याशी जवळचा संबंध होता. त्यामुळे पत्रकार संघटनेच्या कार्याचा हा वारसा आता शिवराज काटकर यांच्या माध्यमातून पुढे जाणार आहे.

श्री.एस.एम.देशमुख यांच्या हस्ते सत्कार – अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर परिषदेचे मुख्य विश्वस्त श्री. एस. एम. देशमुख यांच्या हस्ते शिवराज काटकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी काटकर यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाला मावळते अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, विश्वस्त शरद पाबळे, सरचिटणीस सुरेश नाईकवाडे, कोषाध्यक्ष मन्सूरभाई शेख, महिला आघाडी प्रमुख शोभा जयपूरकर, राज्य शासन अधिस्वीकृती समिती पुणे विभागाचे अध्यक्ष हरीश पाटणी ( सातारा), अधिस्वीकृती समिती लातूर विभागाचे अध्यक्ष तथा परिषदेचे माजी कोषाध्यक्ष विजय जोशी,डिजिटल मीडिया परिषदेचे प्रमुख अनिल वाघमारे, मुंबई प्रेस क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र गांगण, कार्यवाह पांडुरंग म्हस्के यांच्यासह राज्यभरातील पदाधिकारी व ६०० पेक्षा अधिक पत्रकार उपस्थित होते.

मुंबई प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा गौरव – यावेळी मुंबई प्रेस क्लबच्या नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचा एस. एम. देशमुख यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच उदगीर अधिवेशन यशस्वी केल्याबद्दल सचिन शिवशेट्टे आणि त्यांच्या टीमचाही विशेष गौरव करण्यात आला.
उघड्या जीपमधून सांगली शहरात जल्लोष – अध्यक्षपदी शिवराज काटकर यांची निवड झाल्यानंतर सांगली शहरातून त्यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली. एस. एम. देशमुख आणि शिवराज काटकर उघड्या जीपमधून मिरवणुकीत सहभागी झाले. यावेळी पत्रकार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात सहभाग नोंदवत नवनिर्वाचित अध्यक्षांचे अभिनंदन केले. पत्रकारांच्या हक्कांसाठी संघर्ष, पत्रकारितेची विश्वासार्हता जपणे, नवोदित पत्रकारांना प्रशिक्षण देणे आणि राज्यातील पत्रकारांची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम करणे, या दृष्टीने शिवराज काटकर यांच्या नेतृत्वाकडे पत्रकारांचे लक्ष लागले आहे.

