Homeनांदेडलेंडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण अखेर मागे; रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाचे ठोस...

लेंडी प्रकल्पग्रस्तांचे उपोषण अखेर मागे; रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाचे ठोस आश्वासन

सातव्या दिवशी आंदोलनाची सांगता; चार प्रकल्पग्रस्तांना हक्काचा भूखंड देण्याबाबत प्रशासन सकारात्मक

देगलूर, प्रतिनिधी| लेंडी आंतरराज्य प्रकल्पांतर्गत रावणगाव येथील पुनर्वसन गाव खानापूर येथे हक्काचा भूखंड मिळावा, या मागणीसाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू असलेले चार प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण अखेर सातव्या दिवशी मागे घेण्यात आले. ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या मध्यस्थीनंतर प्रशासनाने भूखंड वाटपाबाबत ठोस आश्वासन दिल्याने आंदोलनकर्त्यांनी उपोषण स्थगित केले.

खानापूर येथील रहिवासी हरिबा धोंडीबा फिरंगवाड, प्रकाश बालाप्रसाद श्रीवास्तव, प्रेमलाल दुर्गाप्रसाद श्रीवास्तव आणि राधेश्याम हरिप्रसाद श्रीवास्तव हे गेल्या सात दिवसांपासून देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले होते. सातत्याने उपोषण सुरू असल्याने आंदोलनकर्त्यांची प्रकृती खालावत चालली होती.

दरम्यान, रावणगावचे सरपंच पप्पू हसणाळे आणि नगरसेवक लालू कोयलावार यांनी प्रकल्पग्रस्तांच्या मागणीची गंभीरता ज्येष्ठ नेते रामदास पाटील सुमठाणकर यांच्या निदर्शनास आणून दिली. याची तत्काळ दखल घेत सुमठाणकर यांनी उपविभागीय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अनुप पाटील यांच्याशी संपर्क साधून प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर सविस्तर चर्चा केली. तसेच हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याची आग्रही मागणी केली.

सुमठाणकर यांच्या पुढाकारानंतर प्रशासनाने उपोषणस्थळी भेट देत आंदोलकांशी सकारात्मक चर्चा केली. यावेळी प्रकल्पग्रस्तांच्या भूखंड वाटपाच्या मागणीबाबत प्रशासनाकडून ठोस आश्वासन देण्यात आले. प्रशासनाच्या भूमिकेवर समाधान व्यक्त करत चारही प्रकल्पग्रस्तांनी आपले आमरण उपोषण स्थगित केले.

या वेळी काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णू पाटील, नगरसेवक लालू कोयलावार, सरपंच पप्पू हसणाळे, सुभाष कदम, परवेज शेख, माधव पाटील यांच्यासह परिसरातील नागरिक व पत्रकार उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या मागणीवर प्रशासनाने दिलेले आश्वासन प्रत्यक्षात कधी आणि कशा पद्धतीने पूर्ण होते, याकडे आता खानापूर येथील प्रकल्पग्रस्तांचे लक्ष लागले आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments