Homeनांदेडआ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश; माळेगाव यात्रा परिसर विकासासाठी ६...

आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश; माळेगाव यात्रा परिसर विकासासाठी ६ कोटींचा निधी

बनवस रस्ता, नवा बायपास, घोडेबाजारातील रस्ते, मंदिर परिसरासह विविध कामांना प्राधान्य; चार महिन्यांत कामे पूर्ण करण्याच्या सूचना

नांदेड/लोहा/माळेगाव, प्रतिनिधी| दक्षिण भारतातील प्रसिद्ध माळेगाव यात्रेच्या परिसराच्या विकासासाठी ६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला असून, या निधीतून होणाऱ्या विविध विकासकामांची अंदाजपत्रके तातडीने तयार करण्याच्या सूचना आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यात्रेला अवघे चार महिने शिल्लक असल्याने नियोजित कामे वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे.

स्वातंत्र्यदिनी, दि. १५ ऑगस्ट रोजी माळेगाव येथील शासकीय विश्रामगृहात यात्रा परिसर विकास आराखड्यासंदर्भात आ. चिखलीकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली. यावेळी जिल्हा परिषद, महसूल, बांधकाम, पाणीपुरवठा, पंचायत समिती, पोलीस व संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांशी विविध विकासकामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.

यात्रा परिसरातील विकासकामांमध्ये बनवस रस्त्याचे रुंदीकरण, नवीन बायपास रस्त्याचे मजबुतीकरण, घोडेबाजारातील रस्ते, मंदिर परिसरातील पाणी निचरा व्यवस्था, मानकऱ्यांच्या पालखीची व्यवस्था, पोलीस चौकीतील सुविधा, शासकीय विश्रामगृहासाठी कायमस्वरूपी पाणीपुरवठा, रेस्ट हाऊसचा विस्तार व मिटिंग हॉल आदी कामांचा समावेश आहे.

याशिवाय यात्रा परिसराची हद्द कायम करून त्या ठिकाणी पोल रोवणे, यात्रेच्या ठिकाणी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे यावरही बैठकीत चर्चा झाली. प्रत्येक विभागाने आपल्या अखत्यारीतील कामांचे प्राधान्य निश्चित करून त्यांची अंदाजपत्रके तातडीने तयार करावीत, अशा स्पष्ट सूचना आ. चिखलीकर यांनी दिल्या.

तिसऱ्या टर्ममध्येही माळेगाव यात्रेसाठी निधी – माळेगाव यात्रेला तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख यांनी २००५ मध्ये पर्यटनस्थळाचा दर्जा दिला होता. त्यावेळी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला होता. त्यानंतर आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या दुसऱ्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा निधी मिळाला. आता त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात माळेगाव यात्रा परिसराच्या विकासासाठी आणखी ६ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, ग्रामविकास मंत्री गोरे आणि पर्यटनमंत्री शंभूराजे देसाई यांच्या सहकार्यामुळे हा निधी उपलब्ध झाल्याचे आ. चिखलीकर यांनी सांगितले.

विलासराव देशमुख यांच्या स्मारकासाठी ग्रामस्थांनी पुढाकार घ्यावा – माळेगावचे खंडोबा हे स्व. विलासराव देशमुख यांचे कुलदैवत होते. त्यांच्या प्रयत्नांमुळे माळेगाव यात्रेला मोठ्या प्रमाणात राजाश्रय मिळाला. त्यामुळे ग्रामस्थांनी स्व. विलासराव देशमुख यांच्या स्मरणार्थ पुतळा उभारण्यासाठी जागा उपलब्ध करून देत भव्य स्मारक उभारण्याचा पुढाकार घ्यावा, असे आवाहन आ. चिखलीकर यांनी केले.

विकासकामांसाठी अतिक्रमणांचा प्रश्नही ऐरणीवर – यात्रा परिसराच्या विकासासाठी उपलब्ध असलेल्या मोकळ्या जागेवर काही ठिकाणी अतिक्रमणे झाल्याचा मुद्दाही बैठकीत चर्चेत आला. यात्रा अधिक भव्य व्हावी, अधिक दिवस चालावी आणि भाविकांना सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जाते; मात्र त्यासाठी उपलब्ध जागेचे योग्य नियोजन आवश्यक असल्याचे सांगण्यात आले.

1002830204 आ. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या पाठपुराव्याला यश; माळेगाव यात्रा परिसर विकासासाठी ६ कोटींचा निधी

बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, तहसीलदार विठ्ठल परळीकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय गिरी, बीडीओ कुलकर्णी, युवा नेते सचिन पाटील चिखलीकर, नगराध्यक्ष शरद पवार, माजी नगराध्यक्ष किरण वट्टमवार, जि.प. बांधकाम कार्यकारी अभियंता बालाजी पवार, लोहा तालुका उपअभियंता शिवाजी राठोड, सा.बां. विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुमित पाटील, पाणीपुरवठा अधिकारी डी. बी. बनसोडे, माजी उपनगराध्यक्ष दत्ता वाले, मंदिर ट्रस्टचे दयानंद पाटील, गटशिक्षणाधिकारी गंगाजी, माळाकोळीचे सहायक पोलीस निरीक्षक हिंगोले, अभियंता गुंडावार, माजी उपसभापती रोहित पाटील आंडगेकर, सतीश व्यवहारे, सरपंच हनमंत धुळगंडे, विजय वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व पदाधिकारी उपस्थित होते.

आगामी यात्रा सुरू होण्यापूर्वी आवश्यक विकासकामे पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने वेगाने कार्यवाही करावी, अशी अपेक्षा आ. चिखलीकर यांनी व्यक्त केली.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments