नांदेड | भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ उत्साहात पार पडला. राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास व अपारंपरिक ऊर्जा, दिव्यांग कल्याण मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.



यावेळी पालकमंत्री अतुल सावे यांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानाला नांदेडकरांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल नागरिकांचे अभिनंदन केले. शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार आणि वंचित घटकांच्या सर्वांगीण विकासाला शासनाचे प्राधान्य असून जिल्ह्याच्या विकासाला आणखी गती देण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. स्वातंत्र्यलढ्यात बलिदान देणाऱ्या हुतात्म्यांचे स्मरण करून त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या.


समारंभास माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, खासदार डॉ. अजित गोपछडे, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार आनंदराव पाटील बोंढारकर, महापौर कविता मुळे, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. निलाभ रोहन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश पाटील, मनपा आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी डॉ. रत्नदीप गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर यांच्यासह लोकप्रतिनिधी, स्वातंत्र्यसैनिक व त्यांचे वारसदार, माजी सैनिक, अधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाने जाहीर केलेल्या **‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-२०२६’**ची नांदेड जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील जवळपास १३ हजार शेतकऱ्यांना लाभ मिळाला असून सुमारे १०६ कोटी २५ लाख रुपये त्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत.
पात्र शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळविण्यासाठी ॲग्रीस्टॅक नोंदणी आणि आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले. यासोबतच शेतकऱ्यांना वीजबिलात सवलत देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, कर्जाचा भार कमी करण्याबरोबरच शेतीच्या वीज खर्चातही दिलासा देण्याचे काम सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शेती व शेतीपूरक व्यवसायात कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत दर्जा देण्याच्या शासनाच्या निर्णयाच्या अनुषंगाने नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयात ‘महिला शेतकरी मदत कक्ष’ सुरू करण्यात आला आहे. या कक्षाच्या माध्यमातून महिला शेतकऱ्यांना विविध शासकीय योजना, सुविधा आणि त्यांच्या हक्कांबाबत मार्गदर्शन व मदत मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री सावे यांनी दिली.
जिल्ह्यात मतदार याद्यांच्या SIR प्रक्रियेचे काम अंतिम टप्प्यात असून प्रशासनाने यामध्ये उल्लेखनीय प्रगती केली आहे. मात्र, ज्या मतदारांनी अद्याप गणनापत्रक भरून दिलेले नाही, त्यांनी विहित मुदतीत ते संबंधित BLOकडे जमा करावे, असे आवाहन पालकमंत्री सावे यांनी केले.
भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकता, गतिमानता आणि सुलभता आणण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या ‘महाभूसंपादन व लडार’ प्रणालीचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून नागरिकांना अधिक चांगल्या सेवा देण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, उपजिल्हाधिकारी प्रियंका कर्डिले, उपविभागीय अधिकारी प्रविण मेगशेट्टी आणि त्यांच्या पथकाचे त्यांनी अभिनंदन केले.
कंधार तालुक्यातील बहादरपुरा येथील बबनराव पेठकर यांनी मुलाच्या विवाह सोहळ्यात तब्बल ३ हजार ३६५ नागरिकांचा विमा उतरवून केलेल्या समाजोपयोगी उपक्रमाचाही त्यांनी उल्लेख करत या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घ्यावा, असे आवाहन केले.
विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला – जिल्ह्यातील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून, त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह सिंचनासाठी मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्ह्यात खरीप हंगामातील ९९ टक्के पेरणी पूर्ण झाली असून पिकांची स्थिती चांगली असल्याचे पालकमंत्री सावे यांनी सांगितले. शेतकऱ्यांना अडचणी येऊ नयेत यासाठी प्रशासन दक्षतेने काम करीत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
१५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह – माजी मुख्यमंत्री स्व. सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिनी २१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’ साजरा करण्यात येणार असून, १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह राबविण्यात येणार आहे. जलसंधारणाचे महत्त्व, गाळमुक्त व जलयुक्त गावांची संकल्पना आणि पाण्याचा काटकसरीने वापर याबाबत या सप्ताहात जनजागृती करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात विविध योजनांतर्गत ३४१ किलोमीटर लांबीच्या नदी व नाल्यांचे खोलीकरण करण्यात आले असून, तब्बल ४७ लाख ५४ हजार घनमीटर गाळ काढण्यात आला आहे. जलसाठवण क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने ही कामगिरी महत्त्वपूर्ण असल्याचे पालकमंत्री सावे यांनी सांगितले. या सप्ताहात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.
पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
ध्वजारोहणानंतर पोलीस दलाच्या सलामी पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. राखीव पोलीस निरीक्षक विजयकुमार धोंडगे यांनी सलामी पथकाचे नेतृत्व केले. यानंतर पालकमंत्र्यांनी स्वातंत्र्यसैनिक व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला.
तसेच विठ्ठल श्रीमंतराव खोमणे आणि गंगाराम हनमंतराव जाधव यांना अतिउत्कृष्ट सेवा पदक, तर राजेंद्र राजलिंग सिटीकर, दीपक राजाराम पवार, दत्ता रामचंद्र सोनुले, दिगांबर किशनराव मुसळे, गजानन बळीराम कदम, संतोष परसराम वाघ, सतीश दत्तात्रय मुधोळकर, माधव नारायण येईलवाड आणि महेश दुर्गय्या बुडगु यांचा उत्कृष्ट सेवा पदक जाहीर झाल्याबद्दल गौरव करण्यात आला. नक्षलग्रस्त भागातील ‘ऑपरेशन जुवेन्तुस’दरम्यान ११ जानेवारी २०२३ रोजी झारखंडमध्ये जखमी झालेल्या शिपाई फारुकी शाहारुखखान आजिजखान यांचा ताम्रपट देऊन सन्मान करण्यात आला.
दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या वतीने शिवाजी नामदेव घोरबांड, अंजना पद्माकर कौसल्ये, गणेश देविदासराव कदम आणि ज्योती निवृत्ती तेलंग यांचा सन्मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. सन २०२३-२४ राज्यस्तरीय पीक स्पर्धेतील खरीप व रब्बी हंगामातील विजेते शेतकरी माधव शंकरराव पाटील, सुनील नामदेव चिमणपाडे, रत्नाकर गंगाधर ढगे आणि सुभाष विश्वनाथ यलसटवाड यांचाही यावेळी सन्मान करण्यात आला.
जलसंधारण सप्ताहाच्या नियोजन व प्रभावी अंमलबजावणीसाठी CSR निधीतून योगदान देणाऱ्या इंडो ग्लोबल सोशल सर्व्हिस सोसायटी, धर्माबाद, डियाजिओ इंडिया, धर्माबाद आणि अव्दिक सस्टेनेबल सोल्यूशन, नांदेड या संस्थांचा सन्मान करण्यात आला. यावेळी जलसंधारण विभागाच्या लोगोचे अनावरणही पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. उच्च माध्यमिक, पूर्व माध्यमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतील राज्यस्तरीय गुणवंत विद्यार्थ्यांचाही प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र पंडागळे आणि श्रीमती अंजली नातू यांनी केले. शेतकरी, महिला, विद्यार्थी, कामगार आणि वंचित घटकांच्या विकासाला प्राधान्य देत नांदेड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्याचा निर्धार या स्वातंत्र्यदिनाच्या मुख्य शासकीय सोहळ्यात पालकमंत्र्यांनी व्यक्त केला.

