Homeक्राईमCrime News : नांदेडमध्ये तीन गंभीर गुन्ह्यांवर पोलिसांची तत्पर कारवाई खून प्रकरणात...

Crime News : नांदेडमध्ये तीन गंभीर गुन्ह्यांवर पोलिसांची तत्पर कारवाई खून प्रकरणात पाच जण ताब्यात

इतवारा खून प्रकरणातील एक आरोपी अटकेत, तरोड्यात आईच्या हत्येनंतर मुलाची आत्महत्या

नांदेड| जिल्ह्यात घडलेल्या तीन गंभीर घटनांमध्ये नांदेड पोलिसांनी तत्पर कारवाई करत तपासाला वेग दिला आहे. नांदेड ग्रामीण हद्दीतील इंदरजितसिंघ बावरी खून प्रकरणात पाच जणांना ताब्यात घेण्यात आले असून, इतवारा हद्दीतील भंगार वेचणाऱ्या व्यक्तीच्या खून प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. तर भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तरोडा परिसरात आईची हत्या केल्यानंतर मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मोटारसायकल जप्तीच्या वादातून तरुणाचा खून; पाच जण ताब्यात
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीतील धनेगाव येथे ८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ बलजितसिंघ बावरी (वय २५, रा. संत गाडगेबाबा सोसायटी, जुना कौठा, नांदेड) यांचा खून झाला होता. मोटारसायकल जप्त केल्याच्या कारणावरून निर्माण झालेल्या पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. इंदरजितसिंघ हे चुलत भावासोबत फायनान्सचे काम करीत होते. आठ दिवसांपूर्वी हिंगोली गेट परिसरातून हप्ते थकीत असलेली बजाज पल्सर-२२० मोटारसायकल एजन्सीच्या सांगण्यावरून ताब्यात घेऊन यार्डमध्ये जमा करण्यात आली होती. याच कारणावरून आरोपींच्या मनात राग निर्माण झाला होता.

८ ऑगस्ट रोजी इंदरजितसिंघ आणि त्यांचा चुलत भाऊ पेट्रोल भरण्यासाठी धनेगाव येथील पेट्रोल पंपावर गेले असता, आरोपींनी त्यांच्यावर हल्ला केला. यावेळी इंदरजितसिंघ यांच्यावर खंजराने वार करण्यात आले. त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या चुलत भावाला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची तक्रार आहे. या प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला.

तपासादरम्यान दिलीप पुंडलिक डाकोरे (३३), कृष्णा दिगंबर बारोळे (२९), रणजीत ऊर्फ रंज्या चांदू सूर्यवंशी (२३), ज्योती जगदिश बिगानिया (४०) आणि एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील इतर आरोपी, हत्येसाठी वापरलेले शस्त्र आणि कटामागील भूमिका याबाबत तपास सुरू आहे.

इतवारा खून प्रकरणात एक आरोपी अटकेत
इतवारा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ७ ऑगस्टच्या रात्री संगम कार बाजार परिसरात भंगार वेचणाऱ्या एका व्यक्तीसोबत तीन अनोळखी इसमांचा वाद झाला. या वादातून त्याच्या डोक्यात पेव्हर ब्लॉकने गंभीर मारहाण करण्यात आली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.
सुरुवातीला मृत व्यक्तीची ओळख पटलेली नव्हती.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास केल्यानंतर मृताची ओळख मंगल शंकर गवळी (रा. लोंढे सांगवी, ता. लोहा) अशी पटली. या प्रकरणात सुजल ऊर्फ सृजित सुनील पोटभरे (वय २१, रा. श्रावस्तीनगर, नांदेड) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. घटनेतील अन्य दोन आरोपींचा शोध सुरू आहे. प्राथमिक तपासानुसार दारूच्या नशेत भंगार वेचण्याच्या जुन्या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

आईची हत्या केल्यानंतर मुलाची आत्महत्या
दरम्यान, नांदेड शहरातील राहुल कॉलनी, तरोडा परिसरात ८ ऑगस्ट रोजी सायंकाळी कौटुंबिक कारणातून धक्कादायक घटना घडली. भारती बालाजी चौथरे (वय ५०) यांचा त्यांचा मुलगा प्रतीक बालाजी चौथरे (वय २६) याने लोखंडी रॉड आणि चाकूने मारहाण करून खून केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. त्यानंतर प्रतीक याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.

पोलिस घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. दरवाजा न उघडल्याने खिडकीची काच फोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. एका खोलीत भारती चौथरे रक्तबंबाळ अवस्थेत, तर दुसऱ्या खोलीत प्रतीक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. दोघांनाही शासकीय रुग्णालय, विष्णुपुरी येथे नेण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. या प्रकरणी भाग्यनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस निरीक्षक महेश माळी पुढील तपास करीत आहेत.

प्राथमिक माहितीनुसार प्रतीक याच्यावर मागील काही वर्षांपासून मानसिक आरोग्याशी संबंधित उपचार सुरू होते. कौटुंबिक आणि मानसिक तणावातून ही घटना घडली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या तिन्ही घटनांचा तपास पोलिसांकडून विविध अंगांनी सुरू असून, गुन्ह्यांतील इतर आरोपी, घटनांमागील नेमके कारण आणि पुरावे यांचा तपास करून कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments