हिमायतनगर, अनिल मादसवार| मृत रोपे लावून शासनाच्या निधीवर डल्ला मारण्याचा आरोप उघडकीस येताच सामाजिक वनीकरण विभागाची चांगलीच धावपळ उडाली आहे! टेंभीजवळील माळावर निकृष्ट व मृत रोपे लावल्याचे वृत्त प्रसिद्ध होताच वनपरिक्षेत्र अधिकारी दिनकर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिनांक 21 मंगळवारी तातडीने वृक्षलागवडीच्या ठिकाणी धाव घेत पाहणी केली. एवढेच नव्हे, तर मृत रोपे काढून बाजूला करण्याचा आणि संपूर्ण प्रकारावर ‘मुलामा’ चढविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे.


वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सुरू झालेल्या या अचानक हालचालींमुळे सामाजिक वनीकरण विभागाच्या कारभारावर संशय अधिकच बळावला आहे. कारवाईची चाहूल लागताच पुरावे हटविण्याचा हा खटाटोप तर नाही ना? असा सवाल टेंभी परिसरातील ग्रामस्थ आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.


वीस-पंचवीस वर्षांची झाडे हटवून पुन्हा ‘वृक्षलागवड’! – विशेष म्हणजे, टेंभीच्या माळावर तब्बल २० ते २५ वर्षांपूर्वी सामाजिक वनीकरण विभागाच्या तत्कालीन अधिकाऱ्यांनी वृक्षलागवड केली होती. या झाडांची योग्य देखभाल झाल्याने ती १५ ते २० फुटांपर्यंत उंच वाढली होती. त्यामुळे संपूर्ण माळ परिसर हिरवाईने व्यापला होता. मात्र, शासनाच्या वृक्षसंवर्धनाच्या उद्देश आणि आपली तुंबडी भरण्यासाठी मिळालेली संधी सुटू नये म्हणून सामाजिक वनिकरण विभागातील अधिकाऱ्यांनी भर उन्हाळ्यात जेसीबीच्या सहाय्याने या परिसरातील मोठी झाडे हटवून वृक्षलागवडीसाठी मैदान तयार केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. वाढलेल्या झाडांच्या फांद्या जाळण्यात आल्याचा आरोपही करण्यात येत आहे. ज्यांनी वर्षानुवर्षे जगवलेली झाडे तयार केली, ती तोडायची आणि त्याच जागेवर पुन्हा मृत रोपे लावून वृक्षलागवडीची आकडेवारी दाखवायची हा कोणता पर्यावरण संवर्धनाचा नमुना? असा संतप्त सवाल पर्यावरणप्रेमी नागरिक विचारत आहेत.



जुनी हिरवाई नष्ट; आता कागदी हिरवळ उभी करण्याचा आरोप – एकीकडे शासन कोट्यवधी रुपये खर्च करून वृक्षलागवड व पर्यावरण संवर्धनाच्या योजना राबवत आहे. दुसरीकडे, वर्षानुवर्षे वाढलेली मोठी झाडे हटवून त्याच ठिकाणी निकृष्ट आणि मृत रोपे लावली जात असतील, तर ही शासनाच्या योजनेची उघडपणे थट्टा असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. वृक्षलागवडीनंतर रोपांना पाणी, संरक्षण आणि संगोपनाची ठोस व्यवस्था नसताना केवळ खड्डे खोदून रोपे लावणे, फोटो काढणे आणि काम पूर्ण झाल्याचे दाखविणे सुरू असल्याचा आरोपही यापूर्वी करण्यात आला आहे.

‘डॅमेज कंट्रोल’ नव्हे, आता चौकशी हवी! –वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मृत रोपे हटविण्याची लगबग सुरू झाली असली, तरी मृत रोपे लावलीच का? जुनी झाडे हटविण्याचा निर्णय कोणी घेतला? जेसीबीचा खर्च किती? झाडांच्या फांद्या व झाडे जाळण्यास परवानगी होती का? नव्या वृक्षलागवडीसाठी किती निधी मंजूर झाला आणि प्रत्यक्षात किती खर्च झाला? या प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाने द्यावीत, अशी मागणी होत आहे.
हिमायतनगर सामाजिक वनीकरण विभागातील संपूर्ण कारभाराची उच्चस्तरीय चौकशी करावी, टेंभी परिसरातील वृक्षलागवड व पूर्वीची झाडे हटविण्याच्या प्रकरणाची स्वतंत्र तपासणी करावी आणि दोषी अधिकारी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करून निलंबित करावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमी नागरिकांनी केली आहे.

मृत रोपे हटवून पुरावे झाकण्याचा प्रयत्न कितीही केला, तरी टेंभीच्या माळावरची ‘हरित’ कहाणी आता झाडाझुडपांत लपणार नाही! सामाजिक वनीकरण विभागाच्या या कारभाराची उच्चस्तरीय चौकशी होणार का, की ‘डॅमेज कंट्रोल’ करून प्रकरण दडपले जाणार? याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.
“वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर दोन-तीन दिवसांपासून हिमायतनगर तालुक्यात पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे परिसर हिरवागार दिसताच वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी मंगळवारी वृक्षलागवडस्थळी भेट देऊन हिरवाईच्या पार्श्वभूमीवर फोटोसेशन केले. वरिष्ठ अधिकाऱ्यांना वृक्षलागवड उत्कृष्ट झाल्याचे दाखविण्याचा हा प्रयत्न असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. मात्र, पावसामुळे परिसर हिरवा दिसणे आणि लावलेली रोपे जगणे यात मोठा फरक आहे. त्यामुळे केवळ फोटोसेशन न करता प्रत्यक्ष वृक्षलागवड, रोपांची गुणवत्ता आणि त्यांची जगण्याची स्थिती याची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.”
“टेंभी परिसरातील वृक्षलागवडीची प्रामाणिक आणि निष्पक्ष चौकशी झाली, तर या ठिकाणी पूर्वीची जुनी झाडे तोडून त्याच जागेवर नव्याने वृक्षलागवड केल्याचे सत्य समोर येईल. परिसराची प्रत्यक्ष पाहणी केल्यास तोडण्यात आलेल्या जुन्या झाडांचे जाळलेले अवशेषही आढळून येतात. त्यामुळे केवळ कागदोपत्री नोंदी किंवा फोटोवर विश्वास न ठेवता प्रत्यक्ष स्थळपाहणी करून चौकशी करावी. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली तर सामाजिक वनीकरण विभागाच्या कारभाराचे अनेक धक्कादायक पैलू उघडकीस येतील.” असे पर्यावरणप्रेमी नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत संबंधित वनपरिक्षेत्र अधिकारी दिनकर पाटील व अंबुलगेकर यांच्याशी संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

