हिमायतनगर, प्रतिनिधी | हिमायतनगर तालुक्यातील दुधड-वाळकेवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील सुमारे साडेसहाशे निवासी विद्यार्थ्यांची पाण्याअभावी अतिशय दयनीय अवस्था झाली आहे. गेल्या १५ ते २० दिवसांपासून शौचालय व अंघोळीसाठी पाणी उपलब्ध नसतानाही प्रशासनाकडून अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याचा आरोप पालकांकडून करण्यात आला आहे.


या गंभीर समस्येबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, किनवट येथे लेखी तक्रार करून माहिती देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही परिस्थितीत कोणतीही सुधारणा झालेली नसल्याचे पालकांचे म्हणणे आहे. पाणी उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अंघोळीसाठी नदी-नाल्यांचा आधार घ्यावा लागत असून, शौचालयासाठी जंगल परिसरात जाण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे.


दरम्यान, पालकांनी नुकतीच आश्रमशाळेतील वसतिगृहाची पाहणी केली असता तेथील परिस्थिती अत्यंत गंभीर असल्याचे दिसून आले. गेल्या अनेक दिवसांपासून शौचालयात पाणी नसल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली आहे. शौचालय परिसरात लांब शेपटीच्या आळ्यांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचेही पालकांनी सांगितले. अस्वच्छता आणि पाण्याअभावी अनेक विद्यार्थी आजारी पडल्याचा आरोपही करण्यात आला आहे.



आदिवासी विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी संबंधित हा गंभीर प्रश्न असून, प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न करता तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, स्वच्छता व्यवस्था सुधारावी आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे. या प्रकरणी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी यांनी तातडीने लक्ष घालून संबंधितांवर कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी पालक व नागरिकांनी केली आहे.
