बैल नसल्याने पती-पत्नीने स्वतःच ओढला कोळप; कंधार तालुक्यातील बामणी येथील शेतकऱ्याची व्यथा

NNL Team
By NNL Team
Oplus_16908288

बैलजोडीचे स्वप्न अपूर्ण; तरीही जिद्दीने पिकवले शेत!
कंधार | ‘शेती आमची पंढरी, आम्ही पंढरीचे वारकरी…’ या भावनेने जगणाऱ्या शेतकऱ्याच्या कष्टाचे मन हेलावून टाकणारे वास्तव नांदेड जिल्ह्यात समोर आले आहे. बैलजोडी घेण्याची ऐपत नसल्याने कंधार तालुक्यातील बामणी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी बाबाराव शिराळे यांनी चक्क स्वतःच कोळप ओढत शेतीची मशागत केली. त्यांच्या पत्नीने कोळपणीचे काम करत पतीला साथ दिली.

नांदेड जिल्ह्यात सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकरी पिकांच्या मशागतीच्या कामात व्यस्त आहेत. मात्र, अल्पभूधारक शेतकऱ्यांसमोर आर्थिक अडचणींचे मोठे संकट उभे आहे. बैलजोडी नसल्याने आधुनिक यंत्रसामग्री भाड्याने घेणेही परवडत नसलेल्या शेतकऱ्यांना स्वतःच्या श्रमावर शेतीची मशागत करावी लागत आहे.

बामणी येथील बालाजी शिराळे यांच्या शेतात दिसलेले हे दृश्य अनेकांचे मन हेलावून गेले. शेतकरी स्वतः कोळप ओढत होता, तर त्यांची पत्नी हातात कोळप धरून पिकांमध्ये कोळपणी करत होती. रस्त्याने जाणाऱ्या अनेक नागरिकांनी हे दृश्य पाहिले; मात्र, या कष्टकरी दाम्पत्याची व्यथा जाणून घेण्यासाठी कुणीही पुढे आले नाही, अशी खंत व्यक्त होत आहे.

शेतकरी हा जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो; मात्र आज त्याच पोशिंद्यावर स्वतः बैलासारखी मेहनत करण्याची वेळ आली आहे. शेतीत काबाडकष्ट करून पिकवलेल्या मालाला बाजारात योग्य भाव मिळत नाही. उत्पादन खर्च वाढत असताना शेतमालाला मिळणारा भाव मात्र समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत आहेत.

IMG 20260719 130126 बैल नसल्याने पती-पत्नीने स्वतःच ओढला कोळप; कंधार तालुक्यातील बामणी येथील शेतकऱ्याची व्यथा
Oplus_16908288

“शासनाने आम्हाला बैलजोडी उपलब्ध करून दिली, तर आम्ही अधिक चांगल्या पद्धतीने शेती करू शकू आणि आमचा संसार सुरळीत चालवू शकू,” अशी भावना शेतकरी बालाजी बाबाराव शिराळे यांनी व्यक्त केली. बैलजोडी नसल्याने स्वतःच कोळप ओढण्याची वेळ येणे, हे ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीचे विदारक वास्तव आहे.

शेतकऱ्यांना केवळ आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष मदत, शेतीसाठी आवश्यक साधने आणि त्यांच्या उत्पादनाला योग्य हमीभाव मिळणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांच्या कष्टाचे मोल शासन कधी जाणणार? असा प्रश्न या घटनेमुळे पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

Share This Article
Follow:
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Leave a comment
error: Content is protected !!