हिमायतनगर,अनिल मादसवार| चैत्र शुद्ध नवमी दि.०२ एप्रिल रोजी आलेल्या हनुमान जयंती निमित्ताने विदर्भ – तेलंगाना – कर्नाटक- मराठवाड्यातील ग्रामीण भागात प्रसीध्द असलेल्या बोरगडी येथील मारोती मंदिरात संकटमोचन श्री हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. जय हनुमान.. जय श्रीराम…. बजरंग बली की जय… पवनसुत हनुमान की जय.. च्या जयघोषात भक्तांनी नारळ फोडुन श्रीचे दर्शन घेतले. नवसाला पावणाऱ्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी सकाळी ४ वाजेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केल्याचे पाहावयास मिळाले आहे.


प्रभु श्री रामचंद्राचे परमभक्त श्री बजरंगबली हनुमान यांच्या जन्मोत्सव दिनी प्रतीमा तथा मुर्तीची पुजा अभीषेक केल्याने मणुष्य भयमुक्त होतो…..असे जुन्या जनकारातून सांगीतले जाते. यासाठी सर्वच गाव, वाडी, तांड्याच्या बाहेर श्री बजरंगबली मुर्तीची प्रतीष्ठापना करुन मारोतीरायाचे मंदीर गावाच्या सुरक्षेच्या हेतुने उभारलेले असते. या दिवशी हनुमानाला प्रीय असलेली रुचकीच्या पाने – फुलांची पुष्पमाला, दस्ती टोपी, फेटा अर्पण करुन सर्व संकट, दुखः दुर करण्याची मनोकामना भक्त करतात.

त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी बोरगडी येथील मारोती मंदिरात ३० हजाराहून अधिक भाविकांनी मारोतीरायाचे दर्शन घेऊन मनोकामना केली आहे. दर्शनासाठी दूरदूरवरून भाविक भक्त मोठ्या संख्येने सहकुटुंब परिवारासह दाखल झाले असून, ज्यांचा नवस आहे अश्या भाविकांनी हिमायतनगर शहरापासून तळपत्या उन्हात पाई चालत येऊन हनुमंतरायाचे दर्शन घेत नवस फेडताना पाहावयास मिळाले आहे.



पुरोहित कांतागुरु वाळके यांच्या मंगलमय मंत्रोच्चारात हनुमान जन्मोत्सव मोठ्या हर्षोल्हास व मंगलमय वातावरणात हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ. बाबुराव कदम कोहळीकर यांच्या उपस्थितीत सकाळी ०४ संपन्न झाला. तर ११ वाजता हिंगोली लोकसभेचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी भेट देत मारोतीरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी मंदिर कमिटीच्या वतीने त्यांचा स्वागत सन्मान करण्यात आला.


दि.०३ शुक्रवारी सकाळी 10 वाजता हभप. नारायण महाराज आर्वीकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसादाचा कार्यक्रम संपन्न होणार आहे. दुपारी ०२ वाजता भव्य कुस्त्यांची दंगलीचे उद्घाटक होणार असुन, कुस्तीत विजेत्या मल्लाना बक्षीसे प्रदान करुन गौरवीण्यात येणार आहे. यावेळी नांदेड जिल्ह्यासह हिमायतनगर तालुक्यातील तमाम कुस्ती शौकीन व मल्लांनी हजेरी लाऊन यात्रेची शोभा वाढवावी असे आवाहन मरावती मंदिर कमेटी आणि गांवकर्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

ग्रामीण भागातही हनुमान जन्मोत्सव साजरा
तालुक्यातील मौजे सातशीव वटफळी येथील हनुमान मंदिरासह हिमायतनगर शहरातील पवनसुत हनुमान मंदिर, पोलीस ठाण्याजवळील दक्षीन मुखी हनुमान मंदिर यासह तालुक्यातील छोट्या मोट्या गावात रामभक्त श्री हनुमानाचा जन्मोत्सव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. जवळपास सर्वच मंदिरात भजन – किर्तन, महाप्रसादाच्या पंगती करण्यात आल्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण निर्माण झाले होते.

विदर्भ – तेलंगाना – मराठवाड्यात ख्याती प्राप्त श्री बोरगडीच्या मारुती दर्शनासाठी हजारो भक्त दर्शनासाठी दाखल झाले. तळपत्या उन्हामुळे होणारी जीवाची काहिली लक्षात घेता बोरगडी गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर ठिकठिकाणी पिण्याच्या थंड पाण्याची सोय करण्यात आली होती.



