नांदेड, प्रतिनिधी| वामन पावडे मंगल कार्यालय ते छत्रपती नगर, उमा महेश कॉलनी व आशिष नगरकडे जाणारा रस्ता मागील अनेक वर्षांपासून खड्डेमय झाला असून, या रस्त्याच्या तातडीने दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. याबाबत नागरिकांनी नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांची भेट घेऊन निवेदन साद केले.


परिसरातील नागरिकांनी रस्त्याच्या दुरवस्थेमुळे होत असलेल्या गैरसोयी आमदार कल्याणकर यांच्या निदर्शनास आणून दिल्या. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचून रस्ता चिखलमय होत असल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. तसेच या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात घडत असल्याचे नागरिकांनी सांगितले.


नागरिकांच्या समस्या जाणून घेत आमदार बालाजी कल्याणकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रस्ताव सादर करून निधीची मागणी करण्याचे आश्वासन दिले. हा रस्ता परिसरातील विविध गल्लींना पूर्णा रोड व छत्रपती चौकाकडे जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या रस्त्याचे तातडीने काँक्रिटीकरण करून सी.सी. रस्ता आणि ड्रेनेज लाईन उभारावी, अशी प्रमुख मागणी नागरिकांनी केली आहे.



यावेळी शिवसेना नांदेड उत्तर महिला आघाडीच्या उपजिल्हाप्रमुख सौ. माधुरीताई धुळेकर पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच परिसरातील ज्येष्ठ नागरिक, शिक्षक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्त्याच्या प्रश्नासाठी पुढाकार घेतला. यावेळी रामदास पाटील, कोटलावार, लक्ष्मण वडजे, बालाजी चक्रधर, विजय चव्हाण, ॲड. जे. एम. आठवले, राजेश इटकापल्ले, रामदास कांबळे, उद्धव पाटील, महाजन यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते.

