नांदेड| सलग दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने नांदेड जिल्ह्यातील खरीप हंगाम संकटाच्या छायेत आला आहे. पावसाअभावी जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद यासह प्रमुख खरीप पिकांची वाढ खुंटली असून अनेक भागांत पिके सुकण्यास सुरुवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा, अशी मागणी भाजपा महानगराध्यक्ष तथा आ. अमरनाथ राजूरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे. सुरुवातीला झालेल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी खरीप पिकांची पेरणी केली. मात्र, त्यानंतर पावसाने दीर्घकाळ दडी मारल्याने पिकांना आवश्यक पाणी मिळालेले नाही. परिणामी जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून पिकांची वाढ खुंटली आहे.
उत्पादन घटण्याची भीती – सोयाबीन, तूर, कापूस आणि हळद या पिकांवर पावसाच्या खंडाचा गंभीर परिणाम झाला आहे. बहुतांश भागांत पिके सुकण्यास सुरुवात झाली असून पावसाचा खंड आणखी वाढल्यास उभी पिके हातची जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे. उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता निर्माण झाल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. पेरणीपूर्व मशागत, बियाणे, खते, कीटकनाशके, औषधे आणि मजुरीसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला आहे. मात्र, पिकेच संकटात सापडल्याने केलेला खर्चही भरून निघेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.
तातडीने पीकस्थितीचे सर्वेक्षण करण्याची मागणी – जिल्ह्यातील पर्जन्यमान, खरीप पिकांची सद्यस्थिती आणि शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान यांचे तातडीने सर्वेक्षण करावे. परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून नांदेड जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करावा तसेच शासनाच्या निकषानुसार शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि आवश्यक सवलती उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. या शिष्टमंडळात महापौर कविता मुळे, स्थायी समितीचे सभापती वीरेंद्रसिंघ गाडीवाले, सभागृह नेते महेश कनकदंडे, माजी महापौर जयश्री पावडे, ॲड. निलेश पावडे आदींचा समावेश होता.